मासेमारी बंदीमुळे मासळी महागली

पापलेट 1500 तर सुरमई 1000 रुपये किलो
। उरण । वार्ताहर ।
मासेमारी बंदीच्या आदेशानंतर मासळीचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे दरात मोठी वाढ झाली आहे. उरणच्या मासळी बाजारात पापलेट, सुरमई व कोळंबीचे दर 300 ते 400 रुपयांनी वाढले आहेत. इतर मासळीही महागली आहे. शासनाने खोल समुद्रातील पावसाळी मासेमारी बंदीच्या दिलेल्या आदेशानंतर राज्यातील मासेमारी ठप्प झाली आहे. उरण परिसरातील सुमारे 750 मच्छीमार नौकांनी विविध बंदरात नांगर टाकून विसावल्या आहेत. त्यामुळे मासळीची आवक मोठया प्रमाणावर घटली असल्याने मासळीचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. बंदीमुळे हजारो मच्छीमार बोटींनी करंजा, मोरा, रेवस, मुळेखंड आदी विविध बंदरात नांगर टाकला आहे.पावसाळी मासेमारी बंदीमुळे मासळीचा तुटवडा जाणवत आहे.

पावसाळी मासेमारी बंदी लागू झाल्यानंतर दोन दिवसातच मासळीची आवक मोठया प्रमाणावर घटली आहे. त्यामुळे मासळीचा तुटवडा जाणवत आहे. मासळीची आवक घटल्याने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मासळीचे भाव चांगलेच कडाडले असल्याची माहिती मासळी व्यावसायिक हेमंत गौरीकर यांनी दिली. खोल समुद्रातील मासेमारी बंद झाल्याने आता स्थानिक मच्छीमारांकडून बाजारात विक्रीसाठी येणार्‍या मांदेली, बोंबील, निवठया, भिलजी, कोळीम, बळा, खेंगट, खुबे, कालवे, चिंबोरी, मुठे, किळशी, ढोमी, चिवणी, कोळंबी, वाकटी, बांगडे, तळयातील गोडी मासळी आणि सुकी मासळी येऊ लागली आहे. या दुय्यम प्रतीच्या मासळी खरेदीसाठी आता खवय्यांची गर्दी होऊ लागली आहे.

Exit mobile version