। सावंतवाडी । वृत्तसंस्था ।
येथील मुळ रहिवासी पण युक्रेनमध्ये अडकलेला नेत्रन जायबा धुरी या विद्यार्थ्याने, गेले पाच दिवस आम्ही तळघरात राहत असून, स्फोटांचा प्रचंड आवाज दिवसभर कानात पडत आहे. आम्ही सर्व भीतीच्या छायेखाली असल्याची माहिती त्याने प्रसारमाध्यमांना दिली आहे.
युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्याची सर्वाधिक झळ खाकिंव्ह शहराला बसली आहे. खाकिव्ह येथे सावंतवाडी येथील नेत्रन हा ‘खाकिंव्ह झू वेटनरी युनिव्हर्सिटी’मध्ये पशुवैद्यकीय शिक्षणाच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. तो 8 डिसेंबरला सावंतवाडीतून युक्रेनला गेला होता. महाविद्यालयीन प्रवेशाबाबत त्याचे तिथे काम होते. ते झाल्यानंतर तो पुन्हा भारतात येणार होता; पण तत्पूर्वीच रशियाने युक्रेनवर हल्ला केला आणि जाण्या-येण्याचे सर्वच मार्ग बंद झाले. त्यामुळे तो तेथेच अडकून पडला.
युक्रेन देश सोडून लगतच्या पोलंड देशात जायचे झाल्यास तब्बल अकराशे किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे. त्यात हल्ले सुरू असताना धोका पत्कारायचा कसा, असा प्रश्न आमच्यासमोर आहे. त्यामुळे भारत सरकारने आमच्या बाबतीत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी नेत्रनच्या पालकांसह त्याच्या सोबत असलेल्या इतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.
युक्रेनमधील खाकिव्ह हे शहर रशियाच्या सीमेलगत असल्याने रशियन सैनिकांनी सर्वाधिक हल्ले खाकिंव्हवरच केले आहेत. आजही हल्ले सुरूच आहेत. बाहेर पडणे कठिण झाले आहे. माझ्यासोबत भारतातील सत्तर ते पंचाहत्तर विद्यार्थी आहेत. आम्ही सुरक्षित असलो तरी भारत सरकारने लवकरात लवकर आम्हाला येथून घेऊन जाण्याबाबत निर्णय घ्यावा. – नेत्रन धुरी