अज्ञात वाहनाच्या धडकेत पाच विद्युत खांब कोसळले

। सुधागड-पाली । प्रतिनिधी ।

पालीतील श्री बल्लाळेश्वर गणपती मंदिर परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे एक विद्युत खांब कोसळला. त्यानंतर डोमिनो परिणाम होऊन सलग पाच विद्युत खांब जमिनीवर कोसळले. ही घटना सोमवारी (दि.3) सकाळी सुमारे 8 ते 8.30 वाजण्याच्या दरम्यान घडली. सुदैवाने सकाळची वेळ असल्याने रस्त्यावर वर्दळ कमी होती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. बल्लाळेश्वर गणपती मंदिराच्या प्रवेशद्वारापासून भक्तनिवासापर्यंतच्या मार्गावर ही घटना घडली. त्यामुळे मंदिर परिसरात ये-जा करणाऱ्या भाविकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच पाली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पराग मेहता यांनी तात्काळ महावितरण (एमएसईबी) अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली व आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर महावितरणचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तात्काळ वीजपुरवठा खंडित करण्यात आला आणि कोसळलेले खांब हटविण्याचे तसेच विद्युत यंत्रणा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले.

दरम्यान, या अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू करण्यात आली आहे. संबंधित वाहनाची ओळख पटताच त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून, पाली पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया महावितरणकडून सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

Exit mobile version