| उरण | प्रतिनिधी |
अमेरिका-इराण-इस्रायलदरम्यान वाढलेल्या तणावाचे थेट परिणाम आता महाराष्ट्रातील शेतकरी आणि निर्यातदारांवर दिसू लागले आहेत. नाशिक, पुणे तसेच इतर जिल्ह्यांतील सुमारे 500 हून अधिक कंटेनरमध्ये भरलेला कांदा निर्यात न झाल्याने अडकून पडला आहे. त्याचबरोबर द्राक्षे, केळी, समुद्रातील मासे व इतर कृषीमालही बंदर परिसरात थांबलेला आहे.
हा सर्व माल प्रामुख्याने जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (जेएनपीए) येथून दुबईमार्गे आखाती देशांकडे निर्यात केला जातो. मात्र, सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईतील बाजारपेठ ठप्प झाली असून बंदरात माल स्वीकारला जात नाही. परिणामी, सुमारे 16 हजार टन कांदा कंटेनरमध्ये अडकला असून त्याची किंमत अंदाजे 36 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास हा नाशवंत माल सडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर दुबई, ओमान, सौदी अरेबिया, बहरीन आणि कतार या देशांकडे मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात करण्यात आली होती. मात्र, दुबई बंदर काही काळ बंद राहिल्याने आणि जहाज कंपन्यांनी बुकिंग थांबवल्याने नवीन माल पाठवणेही ठप्प झाले आहे. बंदरात आणि बंदराबाहेर अडकलेल्या मालावर होणारा अतिरिक्त खर्च कोण उचलणार, असा प्रश्न निर्यातदारांसमोर उभा राहिला आहे. सरकारकडून अर्थसहाय्य किंवा दिलासा मिळावा, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे. दरम्यान, युद्धस्थितीवर लवकर तोडगा निघावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असली तरी नाशिक, पुणेसह इतर भागातील शेतकरी मात्र सध्या चिंतेत आहेत.
कांद्याचे 500 कंटेनर्स अडकले; शेतकरी चिंतेत
