| पनवेल | प्रतिनिधी |
स्टीलसाठी दिलेले पाच लाख 14 हजार 400 रुपये परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी अनोळखी इसमाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात दि. 11 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
पनवेल येथील संतोष शंकर अस्वले यांचा बिल्डिंग मटेरियल सप्लायरचा व्यवसाय आहे. त्यांना 9 टन टाटा स्टीलची ऑर्डर मिळाली. डीलरकडे टाटा स्टील उपलब्ध नसल्याने त्यांनी गुगलवर व्यक्ती आणि एजन्सी सर्च केली असता मोबाईल नंबर मिळाला. संपर्क केला असता यावेळी समोरील इसमाने पाच लाख 14 हजार 400 रुपयांचे बिल पाठवले. आणि त्यानंतर संतोष यांनी आरटीजीएसद्वारे पेमेंट केले. दुसऱ्या दिवशी समोरील इसमाने लहान ऑर्डरसाठी डिलिव्हरी होऊ शकत नाही, 15 ते 18 टन ऑर्डर केल्यास डिलिव्हरी केली जाईल अन्यथा ऑर्डर ब्लॉक करून पैसे परत केले जातील, असे सांगितले. त्यावेळेस संतोष यांनी पैसे परत करण्यास सांगितले. त्यावेळी 24 तासात पैसे येतील असे सांगितले. त्यानंतर संतोष यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता समोरील इसमाचे नाव विनोद कुमार व मेरठ येथील बँक असल्याचे समजले. त्यांनी आरटीजीएस केलेले पाच लाख 14 हजार 400 रुपये परत आले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.







