| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त) (जेडीयू) पक्षाला वक्फ विधेयकामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. नितीश कुमारांचा जेडीयू पक्ष एनडीएचा घडक पक्ष आहे. विधेयक मंजूर होण्यासाठी जेडीयूने पाठिंबा दर्शविला होता. विधेयक मंजूर झाल्यामुळे त्याचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पाठविले जाईल. तत्पूर्वी, जेडीयूमधील नेत्यांना मात्र पक्षाचा निर्णय रुचलेला नाही. अनेकांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. तर काहींनी थेट पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आतापर्यंत पक्षाच्या पाच नेत्यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे. जेडीयूच्या नदीम अख्तर यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. त्यांच्या आधी राजू नय्यर, तबरेज सिद्दीकी अलीग, मोहम्मद शाहनवाझ मलिक आणि मोहम्मद कासीम अन्सारी यांनी राजीनामा दिला होता. नदीम राजू आणि तबरेज या नेत्यांनी आज तर शाहनवाज आणि मोहम्मद कासीम अन्सारी यांनी कालच (गुरूवारी) राजीनामा दिला होता.