| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
राजस्थानमधील जयपूर शहरात गुरुवारी (दि.21) सकाळी घरामध्ये सिलिंडरचा स्फोट झाल्याने तीन अल्पवयीन मुलांसह कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. घटनेतील मृत बिहारमधील असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील कुटुंब हे मूळचे बिहारचे असून, राजस्थानमधील जयपूरला कारखान्यात काम करण्यासाठी आले होते आणि जसला गावातील झोपडपट्टीत राहात होते. कुटुंबातील महिला स्वयंपाकघरात काम करत असताना गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. घराला आग लागल्यानंतर त्यांच्या तीन अल्पवयीन मुलांसह कुटुंबातील सर्व सदस्य आगीत सापडले, यात त्यांचा होरपळून मृत्यू झाला, असे एसएचओ राजेंद्र शर्मा यांनी सांगितले. पुढे बोलताना शर्मा म्हणाले, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. घटनास्थळी एफएसएल पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.