भविष्यातील भारतीय संघाचे ‘पाच’ शिलेदार

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

19 वर्षाखालील विश्‍वचषकामध्ये अनेक खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. भारताच्या 19 वर्षाखालील संघाने अंतिम फेरीत धडक मारली असून 11 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील विजेत्यासोबत या युवा संघ विजेतेपदासाठी भिडणार आहे. भारतीय युवा संघ सहाव्यांदा विश्‍वचषकावर नाव कोरण्यापासून एकच पाऊल दूर आहे. भारतीय संघाला अंतिम कोणासोबत आहे याच्याशी काही घेणंदेणं नाही. कारण भारतीय संघाने संपूर्ण वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी करत समोर येणार्‍या प्रत्येक विरोधी संघाला जोरदार टक्कर दिली आहे. या अशा दमदार संघातील पाच खेळाडू असे आहेत ज्यांनी आपल्या कामगिरीने भारतीय संघाचं भविष्य किती उज्वल आहे हे दाखवून दिलं.

कर्णधार उदय सहारन
उदय सहारनने यंदाच्या वर्ल्डकमध्ये कामगिरीत कमालीचं सातत्य दाखवलं आहे. ज्यावेळी भारताचे टॉप 4 फलंदाज 32 धावांवर बाद झाले होते. त्यावेळी त्याने सचिन धस सोबत 171 धावांची भागीदारी रचली. भारताचा विजय निश्‍चित केला. सहारन हा स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने 389 धावा केल्या आहेत. त्यात एक शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे.
मुशीर खान मिस्टर 360 डिग्री
सरफराज खानचा भाऊ मुशीर खान हा सूर्यासारखा मैदानाच्या कानाकोपर्‍यात फटकेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. तो अतरंगी फटक्यांसोबत क्लासिक शॉट्स देखील चांगला खेळतो. त्याला सेमी फायनल सामन्यात फारशी चमक दाखवता आली नाही. मात्र त्याने 6 सामन्यात 336 धावा केल्या असून त्याचे स्ट्राईक रेट हे 100 पेक्षा जास्त आहे. त्याने दोन शतके आणि एक अर्धशतक ठोकली.
फसलेला सामना काढून देणारा सचिन
सचिन धस हा मराठमोळा फलंदाज ज्यावेळी सामना फसतो त्यावेळी आपली कामगिरी उंचावून संघाला अडचणीतून बाहेर काढलं. सचिन धसचे नाव सचिन तेंडुलकरच्या नावावरच ठेवण्यात आलं आहे. त्याचे वडील सचिन तेंडुलकरचे फॅन आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाचं नाव सचिन ठेवलं. ते स्वतःही क्रिकेटपटू होते. सचिनने वर्ल्डकपमध्ये 294 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे. सेमी फायनलमध्ये अडचणीच्या वेळी त्याने 96 धावांची सामना जिंकून देण्यारी खेळी केली.
राज लिम्बानीचे अष्टपैलुत्व
राज लिम्बानी स्पर्धा जसजशी पुढे जात आहे तसतसे रंगात येत आहे. सेमी फायनल सामन्यात या वेगवान गोलंदाजाने 3 विकेट्स घेतल्या. त्याने स्पर्धेत आतापर्यंत 8 विकेट्स घेतल्या असून त्याने फलंदाजीतीही चमक दाखवली. त्याने आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात नाबाद 13 धावांची महत्वपूर्ण खेळी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
सौम्य पांडे छोटा जडेजा
भारतीय संघाला डावखुर्‍या फिरकी गोलंदाजांची चांगली परंपरा लाभली आहे. त्यात आता अजून एका डावखुर्‍या फिरकी गोलंदाजाची भर पडली आहे. सौम्य पांड्याने वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत 17 विकेट्स घेतल्या आहेत. तो स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणार्‍यांच्या यादीत दुसर्‍या स्थानावर आहे. त्याच्या फिरकीच्या जाळ्यात विरोधी संघाचे फलंदाज अलगद अडकतात. आफ्रिकेतील वेगवान गोलंदाजांना पोषक खेळपट्टीवरही सौम्यच्या फिरकीचा बोलबाला आहे.
Exit mobile version