विद्यार्थिनीवर अत्याचार; पाच शिक्षकांना अटक

| ओडिशा | वृत्तसंस्था |

ओडिशातील केंद्रपाडा जिल्ह्यात एका 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका खासगी शाळेतील पाच शिक्षकांना शनिवारी (दि.21) अटक करण्यात आली. सातवीत शिकणाऱ्या या विद्यार्थिनीच्या वडिलांनी आणि जिल्हा बाल कल्याण समितीने राजकनिका पोलीस ठाण्यात स्वतंत्र तक्रारी दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आरोपी शिक्षकांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप या तक्रारींमध्ये करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पीडित मुलीने शिक्षकांकडून बराच काळ लैंगिक छळ होत असल्याचा आरोप केल्यानंतर पालकांनी जिल्हा बाल कल्याण समितीकडे धाव घेतली होती. बाल कल्याण समितीने सुरुवातीला या आरोपांची चौकशी केली आणि त्यानंतर हे प्रकरण पोलिसांकडे सोपवले.

18 फेब्रुवारी रोजी तक्रार प्राप्त झाली होती. 48 तास चाललेल्या तपासणीनंतर, आम्ही कायदेशीर कारवाईसाठी हे प्रकरण पोलिसांकडे पाठवले, अशी माहिती बाल कल्याण समितीच्या सदस्या स्वागतिका पात्रा यांनी दिली. समितीने जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनाही या आरोपांची स्वतंत्र चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. राजकनिका पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक संजय मल्लिक यांनी सांगितले की, मुलीचा जबाब नोंदवण्यात आला असून पीडिता आणि आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. प्राथमिक तपासाच्या आधारे पाचही शिक्षकांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Exit mobile version