थेट सरपंच, चार सदस्यांची बिनविरोध निवड
। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरूड तालुक्यात 15 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक संपन्न होत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु होत नाही तोच इंडिया आघाडीचा झेंडा विहूर ग्रामपंचायतीवर फडकला आहे. विहूरमधील थेट सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव होते. या जागेसाठी इंडिया आघाडीच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाच्या रेश्मा तपीसर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्याचबरोबर इंडिया आघाडीचे चार ग्रामपंचायत सदस्य सुद्धा बिनविरोध निवडून आले आहेत.
विहूर ग्रामपंचायत मुरूड तालुक्यातील प्रतिष्ठेची ग्रामपंचायत समजली जाते. या ग्रामपंचायतीवर सत्ता काबीज करण्यासाठी महायुतीने आपले डावपेच आखले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवसापर्यंत उमेदवार शोधण्यात महायुतीची दमछाक झाली होती. थेट सरपंचपदासाठी इंडिया आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला होता. शेतकरी कामगार पक्षाच्या रेश्मा तपीसर यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आला होता. मात्र महायुतीला सरपंचपदासाठी उमेदवार मिळाला नाही. यामुळे अर्जाच्या छाननीच्या दिवशी सरपंचपदासाठी दाखल झालेला एकमेव अर्ज वैध ठरला. यामुळे विहूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रेश्मा तपीसर विराजमान होणार आहेत.
विहूर ग्रामपंचायतीच्या प्रभाग 2 आणि 3 मध्ये देखील महायुतीला उमेदवार मिळाले नाहीत यामुळे प्रभाग क्रमांक 2 मधून यास्मिन खुर्शीद हलडे, माजी सरपंच निलीशा नरेश दिवेकर, तर प्रभाग 3 मधून महेंद्र कदम व विद्या संदेश दळवी हे इंडिया आघाडीचे चार ग्रामपंचायत सदस्य सुद्धा बिनविरोध निवडून आलेले आहेत. विहूर ग्रामपंचायतीमधील इंडिया आघाडीच्या यशाने कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला आहे. पाच नोव्हेंबरला विधुर ग्रामपंचायतीमध्ये सदस्यपदाच्या पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. या जागादेखील मोठ्या फरकाने जिंकू असा विश्वास येथील इंडिया आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी नवनिर्वाचित थेट सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचे स्वागत पुष्पमाला देऊन करण्यात आले. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सह चिटणीस मनोज भगत, मुरुड तालुका चिटणीस अजित कासार, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उप जिल्हा प्रमुख प्रशांत मिसाळ, तालुका प्रमुख नौशाद दळवी, काँग्रेस तालुका अध्यक्ष सुभाष महाडिक,ॲड.इस्माईल घोले, अस्लम हलडे, माजी जिल्हा परिषद सदस्य वामन चुनेकर, इम्तियाज मलबारी, राहील कडू, सचिन पाटील, माजी सरपंच मुशरत उलडे, मेहबूब उलडे, दत्ता नाकती, रमेश दिवेकर, काशिनाथ पाटील, इकरार मोदी आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.
विहूर ग्रामपंचायतीमध्ये इंडिया आघाडीच्या माध्यमातून शेतकरी कामगार पक्षाचा थेट सरपंच आणि चार सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. कार्यकर्त्यांच्या एकीमुळे आम्हाला हे यश मिळाले असून यापुढील ग्रामपंचायती सुद्धा इंडिया आघाडीच्या माध्यमातून जिंकणार आहोत.
मनोज भगत, जिल्हा सहचिटणीस, शेतकरी कामगार पक्ष