‌‘एमएसआयडीसी’चा भोंगळ कारभार

चुकीच्या गटारकामामुळे चौल सागमळ्यात पुराचा धोका; ग्रामस्थ संतप्त

| रेवदंडा | प्रतिनिधी |

चौल-सागमळा येथे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी) यांच्या स्टॉर्म वॉटर ड्रेनेज प्रकल्पातील गंभीर त्रुटींमुळे ग्रामस्थांच्या जीवितासह मालमत्तेलाही मोठा धोका निर्माण झाला आहे. अर्धवट, चुकीच्या पद्धतीने आणि तांत्रिक निकषांकडे दुर्लक्ष करून करण्यात आलेल्या गटारकामामुळे पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत असून, ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

या प्रकल्पांतर्गत गटाराचे बांधकाम एका बाजूनेच करण्यात आले असून, दुसऱ्या बाजूचे काम तसेच पूर्ण पडती (स्लोप) करण्यात येणार नसल्याची माहिती स्थानिकांना देण्यात येत आहे. त्यामुळे पावसाचे पाणी योग्य दिशेने वाहून जाण्याऐवजी उलट घरांकडे वळण्याचा धोका निर्माण झाला आहे.

राम मंदिराजवळील ‌‘संपन्न’ हॉटेलकडे जाणाऱ्या मार्गाखालील गटार कमी उंचीचे असून, खालचा सिमेंट काँक्रिटचा कोबा अधिक उंच करण्यात आला आहे. परिणामी, पाण्याचा निचरा न होता ते उलट दिशेने वाहून थेट घरांमध्ये घुसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, संपूर्ण बांधकामात लेव्हलमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार असून, काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

या दोषपूर्ण कामामुळे स्थानिकांच्या बागायतींना मोठा धोका निर्माण झाला आहे. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह शेती व बागायतींवर अवलंबून असल्याने ते प्रचंड चिंतेत आहेत. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, ग्रामस्थ “जगो या मरो” अशा अवस्थेत असल्याची भावना व्यक्त करत आहेत. कॉन्ट्रॅक्टरवर विश्वास उरलेला नसल्याचेही ग्रामस्थ स्पष्टपणे सांगत आहेत. ज्या ठिकाणी काम पूर्ण झाले आहे, तेथे संबंधितांना फायदा करून देण्यात आला असून, इतरांना दुर्लक्षित केले जात असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये रंगली आहे.

बंद दाराआड संगनमत?
या प्रकल्पात अनधिकृत कामे आणि बंद दाराआड निर्णय घेतले जात असल्याची चर्चा जोर धरत आहे. कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांमध्ये संगनमत असल्याचा संशय ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत असून, संपूर्ण प्रकल्पाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पावसाळ्यात संकट अटळ?
डोंगरमाथ्यावरून मोठ्या वेगाने येणारे पावसाचे पाणी योग्य निचरा न झाल्यास थेट घरांमध्ये शिरण्याची भीती आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान, बागायतींचे नुकसान तसेच जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संभाव्य आपत्तीबाबत ‌‘जबाबदार कोण?' असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
जनतेची ठाम मागणी
या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. एमएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी या गंभीर प्रकरणात तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य दुर्घटनांसाठी शासनालाच जबाबदार धरले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

मला या कामाबाबत कोणतीही माहिती नाही. कृपया मला याबाबत काहीही विचारू नका. सध्या कामदेखील बंद आहे.

मुर्गन,
प्रोजेक्ट इन्चार्ज, एमएमआयडीसी


हे काम पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने केले जात आहे. गटाराची एक बाजूच बांधली असून, दुसरी बाजू अपूर्ण आहे, त्यामुळे पावसाचे पाणी आमच्या घरात घुसण्याची भीती आहे. आम्ही वारंवार सांगूनही कोणी ऐकून घेत नाही. पावसाळ्यात काही अनर्थ झाला, तर त्याला जबाबदार कोण?

सूर्यकांत पाटील,
ग्रामस्थ, सागमळा
Exit mobile version