पूरामुळे महाडचे जनजीवन विस्कळीत

| महाड | प्रतिनिधी |

गाळ काढल्यानंतर पूर मुक्त महाडची आशा असतानाच महाड शहराला पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत पुराचे पाणी शिरल्याने व्यापारी वर्गात एकच धावपळ उडाली तालुक्यातील सावित्री, गांधारी, आणि काळ नद्यानी धोक्याची पातळी ओलांडल्याने परिसरात पुराचे पाणीच पाणी झाले, यामुळे अनेक मार्ग देखील बंद राहिले आहेत. सोमवारी सकाळी ओसरत जाणारे पाणी पुन्हा भरू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पूर परिस्थिती लक्षात घेता तालुक्यातील शाळा देखील बंद ठेवण्यात आल्या होत्या.

महाड शहर आणि तालुका पुराच्या बाबतीत कायम संवेदनशील राहिला आहे. गेली दोन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसाने तालुक्याला चांगलेच झोडपून काढले आहे. त्यातच महाबळेश्वरमध्ये देखील मुसळधार पाऊस पडत असल्याने या पावसाचा परिणाम महाड शहराला कायम फटका बसत आला आहे. येथील रानबाजीरे धरणातून देखील पाण्याचा विसर्ग वाढला असल्याने सावित्री नदी धोक्याची पातळी ओलांडून आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक मार्ग बंद असून, जनजीवन विस्कळीत झाले. महाड तालुक्यातील खडी पट्टा, वाळण,आणि बिरवाडी भागात देखील पुराच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागला. दादली आणि गांधारी पुलावरून देखील पुराचे पाणी जाऊ लागल्याने हा मार्ग बंद ठेवण्यात आला होता. मुसळधार पावसात साहिलनगर परिसरात एक घर कोसळले. पावसामुळे महाड एसटीचे वेळापत्रक कोलमडले.

Exit mobile version