। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबागमध्ये नवरात्रोत्सवात फुलांच्या किमतीत वाढ झाल्याने हार, फुले, गजरे आणि वेण्या महाग झाल्या आहेत. 5 ते 50 रुपयांनी किमतीत वाढ झाल्याने नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे.
सणासुदीला फुलांच्या किमतीत वाढ ठरलेली असते. या वेळेस नवरात्रोत्सवात गजरा व वेणीमध्ये पाच रुपये वाढले आहेत. त्यामुळे 15 रुपयांचा हार 25 रुपये आणि 60 रुपयांचा हार 100 रुपयांना असल्याने घरोघरी घट बसविणार्या भक्तांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. हार विक्रेते विशाल चांदे यांनी सांगितले, बाजारभाव कमी-जास्त होत असतो. काही ग्राहक सणासुदीला जास्त हार-फुले घेतात. त्यांना हार महाग वाटतो. सर्वसाधारण लहान हार 15 ते 20, मध्यम हार 25 ते 30 आणि मोठे हार 60 ते 80 रुपये दराने विकले जातात.






