नियम पाळा, अन्यथा कारवाई

रिक्षाचालकांना वाहतूक पोलिसांचा इशारा

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

प्रवाशांशी सौजन्याने वागावे, कोणत्याही परिस्थितीत भाडे नाकारू नये आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालकांना दिला. कळंबोली येथील सुधागड विद्यासंकुल सभागृहात सोमवारी आयोजित बैठकीत हा संदेश देण्यात आला.

पनवेल महापालिका क्षेत्रातील पनवेल, कळंबोली, कामोठे आणि खारघर परिसरातील रिक्षाचालक-मालक संघटनांची ही संयुक्त बैठक होती. या बैठकीत आरटीओ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. रिक्षाचालकांनी पांढरा गणवेश व बॅच परिधान करणे बंधनकारक असून, स्थानिक नाक्यांवर शिस्त राखावी, वाद टाळावेत आणि नागरिकांच्या सेवेला प्राधान्य द्यावे, अशा सूचना देण्यात आल्या.

यावेळी रिक्षाचालकांच्या विविध अडचणीही ऐकून घेण्यात आल्या. त्या सोडवण्यासाठी संबंधित विभागांकडून प्रयत्न केले जातील, असे आश्वासन देण्यात आले. मात्र, नियमांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, यावरही अधिकाऱ्यांनी ठाम भूमिका मांडली. या बैठकीस वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी, आरटीओ प्रतिनिधी तसेच विविध रिक्षा युनियनचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने चालक उपस्थित होते.

रिक्षा थांबे वाढवण्याचा निर्णय
पनवेल परिसरात सध्या 132 अधिकृत रिक्षा थांबे असून, 31 हजारांहून अधिक रिक्षाचालक नोंदणीकृत आहेत. थांब्यांच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेता, नवीन अधिकृत थांबे वाढवण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले.
रिक्षाचालकांच्या प्रमुख मागण्या
अधिकृत रिक्षा नाके वाढवावेत.
अंतरानुसार भाडे निश्चित करावे.
रेल्वे स्थानक परिसरात ॲप-आधारित सेवांवर नियंत्रण आणावे.
Exit mobile version