दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेसळीला बसणार आळा
| पनवेल | प्रतिनिधी |
सणासुदीच्या काळात मिठाई, फराळ आणि गोड पदार्थांची मागणी वाढते. मात्र, या काळात दुग्धजन्य पदार्थात भेसळ होण्याची शक्यता जास्त असल्याने अन्न व औषध प्रशासनाने सणासुदीसाठी विशेष तपासणी मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेचा उद्देश नागरिकांना चांगल्या प्रतिची मिठाई व फराळ उपलब्ध होणे हा आहे. मात्र, ग्राहकांनीही मिठाई खरेदी करताना सजग राहण्याचे आवाहन एफडीए प्रशासनाने केले आहे. याशिवाय, मिठाईची मुदत संपण्याची ही तारीख त्यावर लिहावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मिठाई व गोड पदार्थ नाशवंत असतात. त्यामुळे त्यांचे उत्पादन, साठवणूक, मुदतबाह्य तारीख आणि कच्च्या मालाची माहिती दिली जाणे आवश्यक आहे. एफडीएने यावर विशेष लक्ष देत तळण्यासाठी एकाच तेलाचा वापर, कृत्रिम रंग निर्धारित मात्रेपेक्षा जास्त न वापरणे आणि स्वच्छतेच्या निकषांचे पालन झाले आहे का, याची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
सणासुदीच्या काळात, जेव्हा मिठाई आणि फराळ यांची मागणी वाढते, तेव्हा या मोहिमा अधिक महत्त्वाच्या ठरतात, कारण या काळात दुग्धजन्य पदार्थ आणि इतर पदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता जास्त असते. दुधामधून भेसळ रोखणे, पनीरसदृश्य अनालॉग वापर टाळणे आणि गुणवत्तेची नियमित तपासणी करणे या उपाययोजनांमध्ये समावेश आहे. या माध्यमातून कोलेस्ट्रॉल वाढणे, वजन वाढणे आणि आरोग्याशी संबंधित समस्या होऊ नयेत, असा प्रयत्न आहे. मोहीम दरम्यान नागरिकांना अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत तक्रारी टोल-फ्री क्रमांक 1800-222-365 वर कळवता येतील. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी पुरवठा कमी आणि मागणी जास्त असतानाही भेसळ टाळण्यासाठी नागरिक, अन्न व्यवसायिक आणि शासनाने एकत्र काम करावे, असा आग्रह आहे.
प्रशिक्षण, जनजागृती कार्यक्रमांतून मार्गदर्शन
25 ऑक्टोबर 2025 पर्यंत सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा या नावाने विशेष तपासणी मोहीम राबविणार आहे. या मोहिमेत राज्यात नमुने गोळा कारण्यासोबत नागरिकांना प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमांतून मार्गदर्शन करण्याचे प्रयत्न होणार आहेत. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांवर देखील लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.







