उरणमधील विकासाचा मोठा फटका
आदिवासींच्या पावसाळ्यातील उदरनिर्वाहावर गदा
| चिरनेर | प्रतिनिधी |
पावसाचा जोर अद्याप वाढलेला नाही. त्यामुळे पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या आरोग्यवर्धक रानभाज्यांची प्रतीक्षा कायम आहे. गेल्या वर्षी मे महिन्यातच पाऊस सुरू झाल्याने रानभाज्या आणि कंद लवकरच बाजारात विक्रीसाठी आले होते. मात्र, यावर्षी जून महिन्याची अखेर येऊनही पावसाच्या अभावामुळे रानभाज्या उगवलेल्या नाहीत.
उरण तालुका बहुतांश डोंगराळ आणि जंगलांनी वेढलेला असल्याने या तालुक्यात अनेक दुर्मिळ आणि औषधी वनस्पती फळे आणि रानभाज्या आढळून येत असतात. उन्हाळा संपून पावसाळ्याची चाहूल लागली की, या भागातील आदिवासी जंगल, डोंगर आणि रानमाळात उगवणारे करांदे, हळदे यासारखे कंद गोळा करून त्याची उरणसह पनवेल येथील बाजारात विक्री करून आपली उपजीविका करत असतात. तसेच शेवळा, टाकळा, कंटोली, कोरळा, यासारख्या रानभाज्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने, या भागातील बाजारपेठा या रानभाज्यांनी भरून जातात. दरवर्षी पावसाळ्यात या रानभाज्या मिळत असल्याने खवय्यांना देखील या भाज्यांचे वेध लागलेले असतात. पावसाळ्यात बहुतांश आदिवासींना रोजगार नसल्याने तालुक्यातील बहुतेक आदिवासी रानभाज्या गोळा करण्याचा आणि विकण्याचा व्यवसाय करतात आणि त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने खुप उशीरा सुरूवात केली असून, पाहीजे तसा जोर धरलेला नाही. त्यामुळे पावसाअभावी येथील जंगलात रानभाज्या उगवलेल्या नाहीत. त्यातस उरणमध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या विकास कामांमुळे येथील डोंगर आणि जंगले नष्ट केली जात आहेत. त्यामुळे देखील रान भाज्यांचे अस्तित्त्व देखील संपुष्टात येण्याची भीती वर्तविली जात आहे. परिणामी पावसाळी हंगामातील आदिवासी जमातीचा उरनिर्वाह देखील धोक्याची येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आधुनिकीकरणाचा परिणाम
गेल्या काही वर्षांपासून उरण तालुक्यात विकासाच्या नावाखाली प्रचंड प्रमाणात भरावाची कामे सुरू आहेत. त्यामुळे मातीसाठी या भागातील जंगले, डोंगर आणि माळराने पोखरली जात आहेत. त्याचा परिणाम येथील कंद, रानभाज्यांवर झाला आहे. जंगल, डोंगरातून मिळणाऱ्या रानभाज्या आणि कंदाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे पूर्वी एक दोन तासात गोळा करता येणाऱ्या रानभाज्या गोळा करण्यासाठी आता पूर्ण दिवस लागत आहे. तसेच, निसर्ग वाचविण्यासाठी शासनाने या भागातील माती काढण्यास बंदी आणावी, अशी मागणी देखील येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
रानभाज्यांचे औषधी गुणधर्म
पावसाळा सुरू झाला की, डोंगराळ भागात डोंगरमाथ्याला रानभाज्या तयार होतात. या भाज्या कोणतेही खते आणि कीटकनाशकांच्या वापराशिवाय मिळत असल्याने, या भाज्या पौष्टिक आणि औषधी असतात. त्यामुळे या भाज्यांच्या खरेदीकडे ग्राहकांचा अधिक कल असतो. त्यामध्ये कुलू, अंबाडी, शेवळा, टाकळा, भारंगी कंटोळे अशा रानभाज्यांचा समावेश आहे






