कागदातून खाद्यपदार्थांची विक्री सुरुच

महाडमध्ये सरकारी आदेशाला केराची टोपली
। महाड । प्रतिनिधी ।
रद्दी पेपरचा वापर खाद्यपदार्थांकरीता वापरणे हे आरोग्याला घातक असून शासनाने खाद्यपदार्थांकरीता वर्तमान पत्राच्या पेपरच्या वापरावर निर्बंध घातले आहेत. केंद्र सरकारच्या फुड सेफ्टी अ‍ॅन्ड स्टॅडर्ड अ‍ॅथॉरटीने मार्गदर्शनक सुचना देखिल केल्या आहेत. अशा रद्दी कागदाचा वापर केल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते, असे असताना महाड शहरासह बिरवाडी, वरंध, विन्हेरे, कोंझर, पाचाड, हिरकणीवाडी इत्यादी बाजारपेठेमध्ये खाद्य पदार्थाकरीता रद्दी पेपरचा वापर उघडपणे केला जात आहे.


सर्व साधारण नेहमीच्या वापरातील वर्तमान पत्र, शाळेतील वापरलेल्या वह्यांची कागदे, पुस्तके, मासिके, झेरॉक्स मधील कागद अशा विविध प्रकारचा कागद रद्दी म्हणुन वापरला जातो. वर्तमानपत्र आणि इतर छपाई करीता वापरण्यात येणारी शाई मानवी आरोग्याला घातक आहे. तेलकट किंवा इतर पदार्थ जेव्हा कागदाच्या संपर्कामध्ये येतात तेव्हा कागदा वरील शाई असे पदार्थ शोषून घेतात. त्याचवेळी शाई मधील विषारी घटक हे आपल्या शरिरात जातात. त्यामुळे कर्क रोग होण्याची अधिक शक्यता असल्याचे तज्ञांचे मत आहे. आरोग्याला घातक असलेले कागद वापरु नये असा स्पष्ट आदेश केंद्र सरकारतर्फे काढला आहे. मात्र जिल्हा अन्न आणि औषध प्रशासनाकडून सह आयुक्तांच्या आदेशालाच केराची टोपली दाखविली आहे. संबंधित विभागाने रद्दी कागदाचा वापर करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. तरच या रद्दी वापरावर आळा बसायला मदत होणार आहे. – निलेश पवार, अध्यक्ष जनसंवाद संस्था.

Exit mobile version