| महाड । प्रतिनिधी ।
महाड शहर व तालुक्यात प्लॉस्टिक पिशव्यांचा वापर सर्रासपण होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्या नंतर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या महाड उपप्रादेशिक कार्यालय व महाड नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने प्लॅस्टिकचा साठा करणार्या महाडमधील व्यापार्याचे दुकान व गोदामावर छापे मारण्यात आले. यामध्ये एका दुकानदाराकडून 835 किलो प्लॉस्टिक पिशव्यांचा माल जप्त केल आहे.
प्लॅस्टिक बंदीबाबत शासनाचे निर्देश असतानाही काही व्यापार्यांकडे प्लॅस्टिक पिशव्यांचा साठा येत होता. नगर परिषदेच्यावतीने शहरात दवंडी देऊन प्लॅस्टिक वापर, विक्री, साठा करू नये असे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतरही प्लॅस्टिक पिशवीचा वापर सुरु असल्याचे निदर्शनास आल्याने सोमवारी महाड नगरपरिषदेतील अभियंता परेश साळवी व कर्मचारी पथक तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी संदीप सोनवणे यांच्यातर्फे व्यापारी आस्थापनांची पाहणी करण्यात आली.
यामध्ये शहरातील एका घाऊक विक्रेत्याकडे 835 किलो प्लॅस्टिक पिशव्याचा साठा जप्त करण्यात आला व दंडात्मक कारवाई करण्यात आली. यापुढे शहरात पूर्ण प्लॅस्टिक बंदी करण्याचा प्रशासनाने निश्चय केलेला असून नागरिकांनी प्रतिबंधित प्लॅस्टिकचा वापर करू नये असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी केले असून नागरिकही प्लॅस्टिक बंदीला उत्तम प्रतिसाद देत आहेत.