| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिकेच्यावतीने खांदा कॉलनीतील फूटपाथ सुशोभीकरणाचे काम अनेक ठिकाणी रखडल्याचे चित्र आहे. सेक्टर 1 मध्ये फूटपटाथवर बसविण्यासाठी आणलेल्या लाद्या अनेक दिवसांपासून रस्त्याच्या कडेला पडून आहेत, मात्र प्रत्यक्ष काम ठप्प आहे. सेक्टर 13 मध्येही अशीच परिस्थिती असून, नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, सेक्टर 8 परिसरात अद्याप फूटपाथवर लाद्या बसविण्याचे काम सुरूच झालेले नाही. त्यामुळे “आम्हीही नियमित कर भरतो, मग विकासकामांमध्ये हा दुजाभाव का?” असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.
दरम्यान, पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर आता ही कामे सुरू करण्याची तयारी होत असल्याने कामाच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. भर पावसाळ्यात घाईघाईने करण्यात येणारे काम किती दिवस टिकणार? असा प्रश्न नागरिक विचारत असून, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे भविष्यात पुन्हा फूटपाथ उखडण्याची वेळ येऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी रखडलेली कामे तातडीने पूर्ण करून दर्जेदार कामाची खात्री द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.






