बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
| वेनगाव | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील वदप-गौरकामत मार्गाच्या रस्त्यावरील पूल अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. या पुलाच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असून, ते एखादा अपघात होण्याची वाट पाहत आहेत का, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांमधून उमटत आहेत.
वदप-गौरकामत पुलावरील संरक्षण कट्टे जीर्ण झाले आहेत. त्यातील लोखंडी पाईपचे रेलिंग गंज लागून तुटून गेले आहेत. त्यामुळे संरक्षण कठड्यांचा अभावामुळे या पुलावर अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे न चुकून येथून जाणाऱ्या वाहनाचा अथवा पादचाऱ्याचा तोल गेलाच, तर अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसेच, या पुलाच्या दोन्ही बाजूच्या बांधकामांचा काही भाग ढासळला आहे. पावसाळ्यात ढाक डोंगरावरून येणारे पाणी भरमसाट प्रमाणात या पुलाखालून वाहत असते. मुसळधार पावसाच्या पाण्याचा प्रवाहाचा फटका या नादुरुस्त पुलाला बसला, तर या पुलाची अवस्था पाहता हा पूल केव्हाही कोसळू शकतो. त्यामुळे पावसाळ्यात रात्रीच्या सुमारास या पुलावरून जाताना प्रवासी वर्गाला आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तसेच, या पुलावरून जांभिवली, गौरकामत, कुशीवळी व वदप या गावांच्या परिसरातील नागरिकांसाठी कर्जत शहराकडे दळणवळण करण्याचा हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे पावसाळ्यात एखादी दुर्घटना घडलीच तर या गांवांचा कर्जत शहराशी पुर्णपणे संपर्क तुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या पुलाच्या खालच्या बाजूचे बांधकामात भगदाड पडले असून, काही ठिकाणी ढासळले आहे. त्यामुळे हा पूल कधीही कोसळू शकतो. तसेच, या पुलावर सुरक्षा कठडे नाहीत. त्यामुळे या पुलावरून प्रवास करणारे आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. तेव्हा सबंधित विभागाने या पुलाची दखल घेऊन दुरुस्ती करावी.
सुनील वाघमारे,
माजी सदस्य, वदप ग्रामपंचायत







