जाब विचारणार्या महिलेला जीवघेणी मारहाण
| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील आदिवासी खातेदाराच्या नावे असलेली जमीन परस्पर बिगर आदिवासी व्यक्तीच्या नावे करण्यात आली आहे. त्याबद्दल जाब विचारण्यास आदिवासी खातेदार गेले असता तेथे जमिनीचे सपाटीकरण करण्याचे काम करणार्या तरुणांनी आदिवासी महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. तसेच आदिवासी समाजाबाबत अपशब्द वापरल्याबद्दल नेरळ पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
तालुक्यातील ताडवाडी येथील खंडवी या आदिवासी शेतकर्याची जमीन असून, ती जमीन त्यांनी कोणत्याही व्यक्तीला किंवा बिगर आदिवासी शेतकरी यांना विकली नाही. त्याचवेळी सदर जमिनीच्या सातबारा उतार्यावरुन त्यांचे नाव आपोआप गायब झाले. त्याबद्दल त्यांच्याकडून महसूल विभागाकडे अर्जदेखील केला आहे. मात्र, त्या जमिनीमध्ये खोदकाम आणि त्या जमिनीचे सपाटीकरण करण्याचे काम खासगी लोकांकडून सुरु आहे. त्याबद्दल शेतकरी खंडवी यांनी नेरळ पोलीस ठाण्यात आपले म्हणणे तीन दिवस आधी जाऊन मांडले होते. मात्र, त्यानंतर पोलिसांनी जमिनीवर अतिक्रमण करणार्या व्यक्तींना बोलावून समज देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, पोलिसांकडून दिलेले आश्वासन पाळले गेले नाही आणि 4 फेब्रुवारी रोजी ताडवाडी येथे आदिवासी जमिनीवर अतिक्रमण करण्यासाठी पोहचले आणि तेथे जेसीबी मशीनच्या माध्यमातून सपाटीकरण केले जात होते.
ताडवाडी येथील सर्वे नंबर33/2 ही मध्ये एक्झर्बीया कंपनीचे दोन जेसीबी खोदकाम करीत होते. त्यावेळी जमिनीच्या मालक तुलसाबाई खंडवी यांनी जेसीबी चालक यांना सदरची जागा आमची आहे असे सांगून काम बंद करण्यास सांगितले होते. त्यावेळी तेथे असलेल्या पाच अनोळखी तरुणांनी गैरकायद्याची मंडळी एकत्र येऊन सदरचे काम बंद करण्याचा प्रयत्न करणार्या तुळसाबाई खंडवी आणि रंजना प्रकाश खंडवी प्रथम शिवीगाळ आणि नंतर हाताबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळी व दमदाटी केली. अमोल पाटील याने आपल्या हातातील फायबर दांडक्याने डोक्यात, पायावर, हातातील फायबरच्या दांडक्याने मारहाण केली. नेरळ पोलीस ठाण्यात अमोल पाटील आणि गणेश घोडविंदे याच्यासह अन्य चार ते पाच अनोळखी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलिसांनी महिलेचे डोके फुटूनदेखील 307 कलम लावले नाही याबद्दल आदिवासी समाजाचे नेते राम बांगारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे करीत आहे.
