ऍट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील बेडीसगाव येथील जमीन मिळकतीचे नुकसान करणार्या वांगणी गावातील व्यक्तींवर ऍट्रॉसिटी अॅक्ट खाली गुन्हा दाखल करण्याची मागणी बेडीसगाव ग्रामस्थांनी केली आहे. 9 आदिवासी वाड्यांकडे जाणार्या गावकर्यांचा रस्ता बिगर आदिवासी व्यक्तींनी खोदून काढला आहे. दरम्यान, आदिवासींचा रस्ता खोदल्याने बेडीसगाव भागातील आदिवासी वाड्यांचा मार्ग बंद झाला असून रस्ता विनापरवाना खोदणार्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र पोलिसांकडून या आदिवासी लोकांची मागणी मान्य केली जात नसल्याने आदिवासी समाज नाराज झाला आहे.
रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या बेडीसगाव येथील सर्व्हे नंबर 49/12 मध्ये तेथील आदिवासी ग्रामस्थ मालू दरवडा, अनंता दरवडा, मंगल मालू दरवडा यांची वडलोपार्जित मिळकती आहेत. सदर मिळकतीतून मौजे वागणी ते बेडीसगाव असा शासनाने बनवलेला डांबरी रस्ता 40 वर्षापूर्वी अस्तित्वात झाला असून हा रस्ता अमोल विलास शेलार, अशोक विलास शेलार, अतुल विलास शेलार व इतर अनोळखी व्यक्तींनी जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त केलेला आहे. सदर रस्ता उखडून लावल्याने या भागातील 9 आदिवासी वाड्यांच-गावाचा संपर्क पूर्णपणे बंद झाला आहे. ह्याबाबत विचारणा केली असता त्यांनी शेतकरी खातेदार यांना जीवे ठार मारण्याची धमकी देवून जातीवाचक शिवीगाळी केली. त्यामुळे सदर व्यक्तींच्या विरूद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई करण्याची मागणी मालू दरवडा, अनंता दरवडा, मंगल दरवडा यांनी नेरळ पोलिसांकडे लेखी अर्ज करून केली आहे.
तहसीलदारांना विनंती
आदिवासी ग्रामस्थांचा रस्ता खोदून गायब केल्याने बेडीसगावच्या ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. त्यामुळे सदर जुना रस्ता पूर्ववत करून द्यावा अशी मागणी बेडीसगाव ग्रामस्थांनी कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांची भेट घेऊन लेखी अर्ज देऊन केली आहे.
पोलिसांकडून सहकार्य नाही – ग्रामस्थ
आम्ही घटना घडल्यानंतर 7 आणि 8 मार्च रोजी नेरळ पोलीस ठाण्यात जाऊन रस्ता गायब करून आदिवासी लोकांना धमक्या दिल्या जात असल्याची तक्रार केली आहे. मात्र पोलिसांकडून बसून रहा एवढेच सांगितले जात आहे.