दुरदृष्टीकोन हेच सहकारातून समृध्दीकडे वाटचाल करणारे घटक

सहकार आयुक्त अनिल कवडे यांचे प्रतिपादन

| अलिबाग | प्रतिनिधी |

विविध कार्यकारी सहकारी संस्था या देशातील विकासाच्या केंद्रबिंदू आहेत. राज्य सरकार तसेच केंद्र सरकार यांच्यावतीने सुरू असणाऱ्या अभिनव योजनांचा तसेच प्रकल्पांचा यशस्वीपणे पाठपुरावा करून अमंलबजावणी केल्यास सहकारी संस्था या समृध्द होण्यास फार वेळ लागणार नाही, तसेच याच सहकारामधून गतिमानता आणि दुरदृष्टीकोन यांचा स्विकार केल्यास सहकारातून समृध्दीकडे होणारी वाटचाल ही अधिक वेगाने होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी केले.

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, रायगड आणि रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अलिबाग यांच्यातर्फे सहकार सप्ताहनिमित्त मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी कवडे हे ऑनलाईन प्रणालीद्वारे उपस्थित होते. सहकारी संस्थांच्या वाटचालीकरीता आधुनिकता तसेच नविन व्यवसाय अंगिकारणे आवश्यक असल्याबाबत सखोल मार्गदर्शन केले. राज्यातील सहकारातील आदर्शवत बँक म्हणून रायगड जिल्हा सहकारी बँक म्हणून काम करत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजना राबवत असताना जिल्ह्याच्या विकासामध्ये महत्वाचे योगदान दिले आहे. बँकेने पाच हजार कोटी रुपयांचा व्यवसाय देखील पूर्ण केल्याबद्दल कडवे यांनी अभिनंदन केले.

विविध कार्यकारी संस्थांचे संगणकीकरण अंतिम टप्प्यात आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व संस्थांनी तसेच बँकेच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल नाबार्डचे प्रदीप अपसुंदे यांनी आभार व्यक्त केले. संगणकीकरण पुर्ण करणारी देशातील पहिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक होण्याचा बहुमान रायगड जिल्हा सहकारी बँक पटकावेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. सहकारी संस्थांनी पारंपारिक खरीप आणि रब्बी कर्जवाटपामध्ये गुंतून न राहता सहकारामध्ये नाविण्यपूर्ण व्यवसाय करण्यासाठी अधिक प्रयत्नशिल राहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक तथा उपाध्यक्ष सुरेश खैरे यांनी केले.

बँकेच्या वतीने विविध कार्यकारी संस्थांना वेळोवेळी सहकार्य केले जात आहे. संस्थांनी बँकेप्रमाणेच आधुनिकता आणि गतिमानतेसाठी येणाऱ्या काळात तत्पर राहण्याचे आवाहन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी केले. सदर कार्यक्रमाकरीता जिल्ह्रातील 100 पेक्षा अधिक विविध कार्यकारी संस्थांचे अध्यक्ष तथा सचिव आणि पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, रायगड आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.

याप्रसंगी रायगड जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे प्रमोद जगताप, बँकेचे संचालक संतोष पाटील, ज्ञानेश्वर भोईर, महेश म्हात्रे, किसन उमटे तसेच बँकेचे मुख्य व्यवस्थापक भारत नांदगांवकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version