अभिनव ज्ञानमंदिर विद्यालयाचा उपक्रम
| माणगाव | प्रतिनिधी |
छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचालित अभिनव ज्ञानमंदिर, उसर खुर्द विद्यालयामार्फत शनिवार, दि. 29 नोव्हेंबर रोजी उसर खुर्दच्या नदीवर वनराई बंधारा बांधण्याचा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.
या बंधाऱ्याचे उद्घाटन उसर गावचे माजी अध्यक्ष पांडुरंग कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. कार्यक्रमाला शहाजी जगताप, दिलीप घाग तसेच माजी विद्यार्थी आशिष घाग (पाणी समिती सेक्रेटरी), गणेश सावंत, साक्षी विचारे, समीर घाग हे मान्यवर उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी आणि माजी विद्यार्थी सौरभ शिंदे यांनी ग्रामसेवक प्रचित माशाळ यांच्या सहकार्याने बंधारा बांधण्यासाठी लागणाऱ्या सिमेंटच्या पिशव्यांची व्यवस्था केली.
कार्यक्रमात विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी सिमेंटच्या पिशव्यांत माती भरून मोठ्या श्रमांनी बंधारा उभारला. संविधान दिनानिमित्त मुलांना श्रमाचे महत्त्व समजावे, तसेच पर्यावरण-जतनाची जाणीव निर्माण व्हावी या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे मुख्याध्यापक नागनाथ सुर्वे यांनी सांगितले. वनराई बंधाऱ्यामुळे निर्माण झालेले पाणी पंचक्रोशीतील सहा गावांतील गुरांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. तसेच बंधाऱ्यालगत असलेल्या विहिरीतील पाण्याचीही पातळी वाढते. गेली 25 वर्षे उसर हायस्कूल विविध ठिकाणी बंधारे बांधून सामाजिक कार्याचा वसा जपत आहे. या उपक्रमाबद्दल संस्थेचे सरचिटणीस डॉ. निलेश रेवगडे, शालेय समिती अध्यक्ष किशोर अल्हाट, सदस्य विजयराव सावंत, कोषाध्यक्ष विश्वास सोनवणे, तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर जोशी यांनी समाधान व्यक्त करून पुढील शैक्षणिक व सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या. हा बंधारा यशस्वी करण्यासाठी शिक्षक विनोद लाड, कालगुडे, विद्या शिर्के, गावित यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामपंचायत उसर खुर्द तर्फे ग्रामसेवक प्रचित माशाळ यांनी सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देऊन उपक्रमाची सांगता करण्यात आली.
