| तळा | प्रतिनिधी |
सध्या सर्वत्र जंगलात लागणाऱ्या वनव्यांमुळे वनसंपदा धोक्यात आली असून, यामुळे निसर्गाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत असल्याने तो वेळीच रोखणे गरजेचे झाले आहे. अलीकडे वणवे लागण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, बऱ्याचदा हे वणवे नैसर्गिकरित्या कमी तर मानवनिर्मित जास्त असतात. अथक परिश्रम घेऊन शेतकरी आपल्या जागेत आंबा, काजूसह अनेक फळांच्या बागा फुलवितात. मात्र, वनव्यांमुळे अशा अनेक बागांची काही क्षणात राखरांगोळी होते. मात्र, वणवे पेटवणाऱ्या किंवा वणव्यांना कारणीभूत असणाऱ्या व्यक्तींना या नुकसानीचे महत्त्व किंवा त्यामुळे होणारे नुकसान कधी कळणार, असा प्रश्न वनप्रेमीं कडून उपस्थित केला जात आहे.
अनेक गावांत सायंकाळी किंवा पहाटेच्या वेळी गवतासह झाडांचा पालापाचोळा जळून जाण्यासाठी काही नागरिकांकडून वणवे पेटवले जातात. मात्र, वाऱ्याच्या वेगात वणवा सर्वत्र पसरत असून, त्यातून पुढे अनेक दुर्दैवी घटना घडतात. बहुतांश गावातून शेतकरी भातपीक घेण्यासाठी तरवा तयार करतात. त्यासाठी गवत, पेंढा, कवळ, शेणाचा वापर करतात. यात कवळ तोडीचा फटकाही झाडांना बसत आहे. तसेच तरव्यासाठी वणवे पेटवले जात असल्याने त्याचा फटका येथील वनसंपदेला व शेतीला बसू लागला आहे. डोंगरातील अशा वणव्यांमुळे येथील विविध प्रकारची उपयुक्त वृक्षवेलीही नष्ट होऊ लागल्या आहेत. वणवा विरोधी कायदा असला तरी तो सक्षमपणे राबवला जात नसल्याने कायद्याचे भय वणवे पेटवणाऱ्या या मंडळींना उरले नाही. परिणामी, गेल्या काही वर्षांपासून वनव्याचे प्रकार वाढत असल्याचे वनप्रेमींचे म्हणणे आहे. त्यामुळे वणवा विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
वनव्यांमुळे होतोय निसर्गाचा ऱ्हास
