कंपनीविरोधात गुन्हा दाखल
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
कंपनी बंद करण्याचे आदेश असतानाही छुप्या पद्धतीने काम सुरु ठेवणार्या एका न्यूडल्स कंपनीच्या मालकाविरोधात अन्न आणि औषध प्रशासनाकडून कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कामोठे, सेक्टर-19 मधील कुमार फुड प्रॉडक्ट्स कंपनीमधून मिरची सॉस, टोमॅटो सॉस, अॅपल सॉस, केचप (सॉस) यासारखे अन्न पदार्थ तयार केले जात होते. मात्र, त्यासाठी या कंपनीकडून खराब पदार्थांचा आणि दूषित पाण्याचा वापर करण्यात येत असल्याचे ‘मनसे’च्या पदाधिकार्यांना आढळून आल्यानंतर त्यांनी याबाबत अन्नऔषध प्रशासन विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने अन्न-औषध प्रशासन विभागाने जुलै महिन्यामध्ये कुमार फुड प्रॉडक्ट्सच्या कामोठे, सेक्टर19 मधील कंपनीची तपासणी केली होती. या तपासणीत अन्न सुरक्षा मानदे कायद्यामधील विविध तरतुदींचे उल्लंघन केल्याचे आढळून आले होते.
त्यामुळे अन्न-औषध प्रशासन विभागाने सदर त्रुटींची पूर्तता करेपर्यंत अन्न व्यवसाय बंद करण्याचे आदेश कंपनीचे मालक राकुमार राऊत यांना दिले होते. त्यानुसार राऊत यांनी काही दिवस आपला व्यवसाय बंद केला. मात्र, ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांनी रात्रीच्या अंधरात लपूनछपून आपल्या अन्न व्यवसायाला सुरुवात केली होती. याबाबतची तक्रार अन्न औषध प्रशासन विभागाकडे गेल्यानंतर अधिकार्यांनी गत आठवड्यात पुन्हा या कंपनीच्या गाळ्याला भेट देऊन पडताळणी केली. मात्र, यावेळी सदर गाळ्यामध्ये अन्न व्यवसाय सुरु नसल्याचे समोर आले. परंतु, एफडीएच्या अधिकार्यांनी सदर कंपनीचे मालक राजकुमार राऊत यांची चौकशी करुन त्यांचा जबाब घेतला असता, राऊत यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी 15 ऑगस्टपासून पुन्हा तोच अन्न व्यवसाय त्याच ठिकाणी रात्रीच्या अंधारामध्ये लपूनछपून सुरु केल्याची कबुली दिली. राजकुमार राऊत यांनी अन्नऔषध प्रशासन विभागाने अन्न व्यवसाय बंद ठेवण्याच्या दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याने राऊत यांच्याविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.