पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद ठाकूर यांचे निधन
। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद केशव ठाकूर यांचे गुरुवारी (दि. 26) सकाळी त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. प्रमोद ठाकूर यांच्या निधनाने शेकापचा निष्ठावंत कार्यकर्ता हरपल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत असून, परिसरात शोककळा पसरली आहे.
अलिबाग तालुक्यातील कुसुंबळे येथील रहिवासी असणारे प्रमोद ठाकूर यांनी राजकीय, सामाजिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. ग्रामपंचायत सरपंचपासून पंचायत समिती सभापती म्हणून त्यांनी जबाबदारी खंबीरपणे सांभाळली. मनमिळाऊ, मितभाषी, वेळप्रसंगी अन्यायाविरोधात खंबीरपणे उभे राहणारे प्रमोद ठाकूर यांचा अनेक क्षेत्रात मोलाचा सहभाग राहिला आहे. क्रीडा क्षेत्रातदेखील त्यांचे योगादन राहिले आहे. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे खजिनदार म्हणून ते कार्यरत होते.
कुसुंबळे येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक आदी विविध क्षेत्राबरोबरच मॉर्निंग वॉक ग्रुप, ग्रामस्थ कुसुंबळे, नवरात्र उत्सव मंडळ, भजन मंडळ कुसुंबळेेचे पदाधिकारी, सभासद, नातेवाईक, मित्रमंडळांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रमोद ठाकूर यांचा दशक्रिया विधी शनिवारी (दि. 4) जानेवारीला होणार असून, मंगळवारी (दि.7) जानेवारीला राहत्या घरी तेरावे होणार असल्याची माहिती ठाकूर कुटुंबियांकडून देण्यात आली आहे.
त्यांच्या अंत्यविधीसाठी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे, अलिबाग तालुका खरेदी-विक्री अध्यक्ष सत्यविजय पाटील, श्रीगाव माजी सरपंच नरेश म्हात्रे, उपसरपंच विलास म्हात्रे, पं.स. माजी सभापती सुधीर थळे, शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांसह अन्य पक्षातील नेतेमंडळी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आठवणींना उजाळा
राजकारणातून समाजहित जपणारा कार्यकर्ता अशी प्रमोद ठाकूर यांनी आपली ओळख कामातून निर्माण केली होती. अनेक वर्षे रखडलेल्या कुसुंबळे-वाघविरा रस्त्याचे त्यांच्याच कारकीर्दीत पूर्ण झाल्याची आठवण आज अनेकांनी बोलून दाखवली. सत्ता आणि पदाचा उपयोग त्यांनी केवळ गोरगरिबांची सेवा करण्यासाठी केल्याच्या आठवणीसुद्धा यावेळी जाग्या झाल्या.
कार्यकाळ प्रमोद ठाकूर यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात कुसुंबळे ग्रामपंचायतीपासून केली. त्यांनी चार वेळा कुसुंबळे ग्रामपंचायतीचे सरपंचपद भूषवले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक विकासाची कामे केली. राजकारणातील त्यांची चुणूक पाहून त्यांना पंचायत समितीवर संधी देण्यात आली. अलिबाग पंचायत समितीचे दोन वेळा त्यांनी सभापतीपद भूषवले आहे.