| पनवेल | प्रतिनिधी |
मुसळधार पावसात टायर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या एसटी बसमध्ये घुसून चोरट्याने प्रवासी तिकीट पेटी, 48 हजारांची रोकड, मोबाईल आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेल्याची घटना खारघर येथील बेलपाडा मेट्रो स्थानकाजवळ घडली आहे. या प्रकरणी खारघर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. बस वाहक सचिन गांगुर्डे (36) हे बोईसर आगारातून बोईसर-कोल्हापूर मार्गावरील बस घेऊन निघाले होते. मध्यरात्रीच्या सुमारास बसचा टायर पंक्चर झाल्याने बस रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली. प्रवाशांना दुसऱ्या बसमधून रवाना केल्यानंतर चालक व वाहक पाऊस थांबण्याची वाट पाहत बसमध्येच झोपले. पहाटे जाग आल्यानंतर लोखंडी तिकीट पेटी आणि चालकाची बॅग चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तिकीट पेटीत 1 ते 100 रुपयांच्या प्रवासी तिकिटांसह 48 हजारांची रोकड होती. चालकाच्या बॅगेत मोबाईल, आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड आदी महत्त्वाची कागदपत्रे होती.







