| कोलाड | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावरून पुई गावाजवळून जाणारी महिसदरा नदीने दुसऱ्या दिवशी ही धोक्याची पातळी ओलांडली असून, या नदीचे पाणी दोन दिवसापासून गोवे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आले आहे. त्यामुळे गोवे गावाकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. तसेच, सर्व भातजमीन सतत दोन दिवस पाण्याखाली गेली असून, गोवे येथील समर्थ नगर, बौद्धवाडी तसेच गोवे गावातील काही घरात पाणी शिरूर मोठे नुकसान झाले आहे.
गेली चार ते पाच दिवस सतत पडत असेलेल्या मुसळधार पावसामुळे कोलाड परिसतील महिसदरा, कुंडलिका, गोदी नदी दुसऱ्या दिवशी ही दुधडी भरून वाहत आहेत. या तिन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर गोवे गावाला दोन दिवसापासून पाण्याचा वेढा घातला असून, पुराचे पाणी रस्त्यावर आले आहे. काही घरात पाणी शिरूर मोठे नुकसान झाले आहे. तर, भातशेती पाण्याखाली गेल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, पुराच्या पाण्यामुळे येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाल्यामुळे धाटाव एमआयडीसीमध्ये कामावर जाणारे कामगार तसेच कोलाड बाजारपेठेत जाणारे नागरिकांना घरीच बसावे लागले. तर, पावसाचा जोर कायम राहणार असल्यामुळे नागरिकांनी शक्य असेल तर घरा बाहेर पडा, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला.







