कशेडी घाटात 24 तासांमध्ये चार अपघात

चौपदरीकरणानंतरही अपघातांची मालिका कायम

। पोलादपूर । प्रतिनिधी ।

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटामध्ये गेल्या 24 तासांमध्ये चार अपघात झाले आहेत. महामार्गाच्या चौपदरीकरणानंतरही अपघातांची मालिका कायम असल्याचे दिसून येत आहे.

मंगळवारी सकाळी 11 वाजता युनिस आगा यांनी फिर्याद दिल्यानुसार त्यांच्या ताब्यातील बस (जीए-05-एफ-001-टीसी-0027) ही गोवा ते पनवेल अशी घेऊन जात असताना भोगाव गावाच्या हद्दीमध्ये मागील बाजूने भरधाव वेगाने येणाऱ्या एसटी बस (एमएच-20-बीएल-4048) सिद्धार्थ गंगाधर बडे हा रत्नागिरी ते वसई चालवित रस्त्याची पर्वा न करता गोवा-पनवेल बसला धडकला. याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी वाहतूक पोलीस धायगुडे, पोलीस हवालदार जागडे यांनी पंचनामा करून एसटी बस चालक सिध्दार्थ बडे याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला. भोगाव खुर्द येथे जुना डांबरीकरणाचा मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग असून, याठिकाणी चौपदरीकरण झालेले नाही.


मंगळवारी दुपारी चोळई गावाच्या हद्दीमध्ये कशेडी घाटाच्या तीव्र वळण उतारावर मशिनरी घेऊन जाणारा ट्रक (जीजे-17-एक्सएक्स-0871) चालकाचे वाहनावरील नियंत्रण ढळल्याने कलंडला. यावेळी रस्त्याच्या संरक्षक कठड्यालगत हा ट्रक क्लिनर बाजूला पलटी झाला. या ट्रकपासून काही अंतरावर बुधवारी सकाळी एक टँकर रस्त्याच्या संरक्षक भिंतीलगत कलंडला. काही तासांतच आणखी दोन ट्रक सकाळी कलंडलेल्या टँकरच्या मागील भागात कलंडल्याने चोळई येथील कशेडी घाटातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणानंतर झालेल्या अपघातांची संख्या चार झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी कोकणातील पत्रकारांनी कशेडी घाटामध्ये केलेली आंदोलने अपघाताच्या घटना टाळण्यासाठी असताना प्रत्यक्षात झालेल्या चौपदरीकरणामुळेदेखील अपघाताचे प्रमाण वाढल्याने कशेडी घाट अद्याप मृत्यूपंथाचे द्वार असल्याची परिस्थिती दिसून येत आहे.

Exit mobile version