। पोलादपूर । प्रतिनिधी ।
पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटामध्ये शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास चार वाहनांच्या विचित्र अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून चौपदरीकरणादरम्यान भुयारी मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यापुढील कशेडी घाटातील कशेडी टॅपपर्यतचा रस्ता अरूंदच असल्याने हा अपघात घडल्याचे दिसून येत आहे.
बारामती-पुणे ते दापोली जाणारी हुंदाई आय ट्वेन्टी कार वरील चालक कैलास मनोहर वनवे (रा.-बारामती,जि. पुणे) यांच्या ताब्यातील हुंदाई आय ट्वेन्टी गाडीला मागून येणाऱ्या टँकरने ठोकर दिल्याने हुंदाई आय ट्वेन्टी गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूस नाल्यामध्ये गेली. तसेच, बारामती-पुणे ते दापोली जाणारी क्रेटा कार गाडीवरील चालक सुयोग जयवंत कुलकर्णी (31, रा.बारामती, जि.पुणे) यांनी टँकरला ओव्हरटेक करून पुढे जात असताना समोरून गोवा बाजूकडून मुंबई बाजूकडे जाणारा अशोक लेलँड ट्रक या वाहनाला समोरासमोर ठोकर दिल्याने अपघात घडलेला आहे. अपघातामधील दोन्ही कार गाडयांच्या एअर बॅग ओपन झालेले आहेत. तसेच, अपघातामध्ये हुंदाई आय ट्वेन्टी गाडीमधील मागे बसलेले प्रवासी दत्तात्रय शरद टेके 42 वर्षे, रा. माळेगाव बु. ता. बारामती, जि.पुणे) यांना मुका मार लागून अंतर्गत दुखापती झाल्याने त्यांना तात्काळ नरेंद्र महाराज रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालय पोलादपूर येथे दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी दत्तात्रय टेके यांना तपासून ते मयत झाल्याचे घोषित केले. अपघातातील वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे.
सदर अपघातामध्ये अन्य कोणालाही कोणत्याही प्रकारे दुखापत झाली नाही. अपघातामधील चारही वाहनांचे नुकसान झाले असून या प्राणांतिक अपघाताचा विशेष अहवाल पाठविण्याची तजवीज ठेवल्याची माहिती एपीआय चंदने आणि एएसआय बोडकर यांनी दिली.