साडेचार टन प्लास्टिक पिशव्या जप्त

माणगाव नगरपंचायतीची दुकानावर धाड; कारवाईमुळे शहरात एकच खळबळ

| माणगाव | प्रतिनिधी |

प्लास्टिक पिशव्यांवरील शासनबंदीची कठोर अंमलबजावणी करत माणगाव नगरपंचायतीने सोमवारी दुपारी कचेरी रोड येथील पंकज जनरल स्टोअर्स या दुकानावर अचानक धाड टाकून सुमारे साडेचार टन प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून छोटे मोठे उद्योग धंदेवाले भाजी विक्रेते, फळ विक्रेते, मच्छी विक्रेते, व्यापारी व विविध विक्रेत्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून एकच खळबळ उडाली आहे. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

गेल्या अनेक वर्षांपासून संबंधित दुकानातून माणगावातील छोट्या-मोठ्या दुकानदारांना, भाजी विक्रेत्यांना, मच्छी विक्रेत्यांना तसेच विविध व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा पुरवठा हा व्यापारी करीत असल्याची माहिती नगरपंचायतीला मिळाली होती. त्यानुसार नियोजनबद्ध छापा टाकून मोठा साठा जप्त करण्यात आला. शासनाने प्लास्टिक पिशव्यांवर स्पष्ट बंदी घातलेली असताना माणगावात मात्र दिवसाढवळ्या विक्री सुरू असल्याबाबत नागरिकांत तीव्र नाराजी पसरली होती. माणगाव नगरपंचायतीने यापूर्वी वारंवार सर्व व्यापारी, दुकानदार व उद्योगधंदेवाल्यांना नोटिसा बजावून प्लास्टिक बंदीच्या सूचना तोंडी तसेच लेखी दिल्या होत्या. तरीही नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याने पत्रकारांनी वारंवार ‌‘प्लास्टिक बंदी केवळ कागदावरच’ असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध केल्या होत्या.

प्लास्टिक पिशव्यांमुळे शहरातील गटारे तुंबून मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पर्यावरणीय हानीसोबतच नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नगरपंचायतीने केलेली ही कारवाई नागरिकांच्या अपेक्षांना प्रतिसाद देणारी मानली जात आहे. दरम्यान, जप्त केलेल्या प्लास्टिक साठ्यावर पुढे कोणती दंडात्मक कारवाई होणार, संबंधित दुकानावर सील ठोकण्यात येणार का, किंवा कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगरपंचायतीच्या या धडक कारवाईमुळे प्लास्टिक विक्री करणाऱ्या इतर व्यापाऱ्यांना इशारा मिळाला असून, आगामी काळात बंदीची अंमलबजावणी अधिक कडक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कचरा पर्यावरणासाठी घातक
सध्या प्लास्टिकचा कचरा सर्रास जाळला जात असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. कचरा जाळण्याचे प्रमाण जास्त आहे. त्याशिवाय, विविध भागांमध्ये प्लॉस्टिकच्या पिशव्यांमध्ये भरुन कचरा रस्त्यांच्याकडेला, नदीपात्रात टाकण्यात येत असल्याचे चित्र पाहण्यास मिळते. प्लास्टिक कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी पेटविला जात असल्याने तो पर्यावरणासाठी घातक ठरत आहे. तसेच प्लास्टिक जळताना होणार धुर मानवास अधिक घातक ठरत आहे.
Exit mobile version