विजेच्या तारांचा शॉक लागून चार जनावरांचा मृत्यू

। पनवेल । प्रतिनिधी ।

महावितरणच्या जीर्ण वीजतारांमुळे ग्रामीण भागात मुक्या जनावरांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून, विजेच्या तारेचा तीव्र धक्का लागून चार जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील दुंदेपाडा गावाजवळ घडली. या घटनेमुळे परिसरातील पशुपालकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, मृत जनावरांच्या मालकांना योग्य ती भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुंदेपाडा गावाच्या हद्दीतील अंतर्गत रस्त्यावर विजेची तार तुटून पडली होती. या तुटलेल्या तारेला स्पर्श झाल्याने नेरटघर गावातील सुनील भोपी यांचे दोन जनावरे एक बैल आणि एक गाय, तसेच खैरवाडी येथील हिरामण पाटील यांचे दोन जनावरे एक बैल आणि एक गाय अशा एकूण चार जनावरांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.

महावितरणकडून घरोघरी स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू असली, तरी ग्रामीण भागातील वीज वितरण यंत्रणेची दुरवस्था कायम असल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे. अनेक ठिकाणी वीजवाहिन्या जीर्ण झाल्या असून, त्या तुटून पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. काही महिन्यांपूर्वीही अशाच प्रकारे वीजतार तुटल्याने जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र, त्यानंतरही महावितरणकडून आवश्यक ती देखभाल आणि दुरुस्ती केली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.

दुंदेपाडा येथील घटनेत सुदैवाने कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. मात्र, तुटलेली वीजतार एखाद्या नागरिकाच्या संपर्कात आली असती, तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. त्यामुळे पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातील जीर्ण वीजतारांची तातडीने तपासणी करून त्यांची दुरुस्ती करावी, तसेच मृत जनावरांच्या मालकांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Exit mobile version