41 जनावरांना लागण; शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण
| महाड । वार्ताहर ।
दोन महिन्यापूर्वी पाळीव जनावरांमध्ये लंपी हा आजार दिसून आला आणि संपूर्ण देशभरात शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. महाड तालुक्यात लंपीचा आजाराने गंभीर परिस्थिती निर्माण झाली नसली तरी आतापर्यंत जवळपास 41 पाळीव जनावरे या आजाराने ग्रस्त आहेत. आतापर्यंत पाच जनावरांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाप्रमाणे गुरांमध्ये लंपी या आजाराची लक्षणे दिसून येताच शेतकर्यांमध्ये घबराट पसरली होती. सुरवातीच्या काळात दुध विर्क्रीवर देखील याचा परिणाम जाणवू लागल्याने संपूर्ण देशभरात पाळीव जनावरांना लसीकरण करण्याचे आदेश शासनाने दिले. पशुवैद्यकीय विभागाने तालुक्यात लसीकरण पूर्ण केले असले तरी आजही पाळीव जनावरांमध्ये लंपीचा प्रादुर्भाव कायम असल्याचे दिसून येत आहे. महाड तालुक्यात नोव्हेंबर पासून आतापर्यंत 41 जनावरांना लंपीची बाधा झाली होती. तर पाच जनावरे या आजाराने मृत्यू पावल्याची माहिती पशुवैद्यकीय विभागाकडून देण्यात आली. लसीकरण आणि शासकीय आदेशानुसार केले जाणारे उपाय यामुळे तालुक्यात जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण मात्र कमी आहे.
तालुक्यात लंपी आजाराचा प्रसार थांबवण्यासाठी शासकिय आदेशानुसार प्रशासनाने उपाययोजना केल्या होत्या. तालुक्यात रुपवली, पाणे, वरंध, किंजालोळी, पारमाची, तळीये, तेलंगे, घेरा किल्ला रायगड, मुमुर्शी, आदी गावातून लंपीच्या आजाराने जनावरे ग्रस्त झाली होती. शेतकर्यांमध्ये जनजागृती करत पाळीव जनावरांची काळजी शेतकर्यांनी घेतली असली तरी तळीये येथे दोन, आंबेशिवथर येथे एक, पिंपळवाडी येथे एक, किंजलोळी एक अशा एकूण पाच गुरांचा लंपी आजाराने मृत्यू झाला आहे. दोन दिवसापूर्वी देखील लंपी आजाराने एक गाय मृत्यूमुखी पडल्याने लंपी आजाराचा धोका आजदेखील कायम असल्याचे दिसून येत आहे. लंपी आजाराबाबत महाड तालुक्यात जवळपास 24,700 जनावरांना लसीकरण झाले आहे. लंपी या आजाराच्या लक्षणांमध्ये प्रथम जनावरांना ताप येतो. त्यांचे वजन कमी होते, जनावरांच्या डोळ्यातून चिकट पाणी टिपकते, तोंडातून लाळ पडते, शरिरावर छोट्या गाठी यायला लागतात. अशी लक्षणे गाई आणि म्हैसीमध्ये पोलादपूर तालुक्यातील सवाद, धारवली, महाड तालुक्यातील किंजलोली, निगडे आदी गावांमध्ये आजदेखील दिसून येत असल्याचे शेतकर्यांनी सांगितले.
लंपी हा जनावरांचा त्वचा विकार असून जनावरांना लक्षणे दिसून आल्यास शेतकर्यांनी पशुवैद्यकीय विभागाकडे संपर्क साधावा. शिवाय प्राथमिक उपचार म्हणून कडूनिंब पानांच्या लेपाचा वापर करावा.
डॉ. अश्विनी पडळकर
पशुवैद्यकीय अधिकारी, पंचायत समिती, महाड