देशांतर्गत सलग चारदा एकाच वेळी निवडणूक

। रायगड । प्रतिनिधी ।

स्वातंत्र्यानंतर देशातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून सलग चार वेळा लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेतल्या गेल्या. याद्वारे एक देश-एक निवडणूक ही संकल्पना अप्रत्यक्षपणे राबविली गेली.

1952, 1957, 1962 आणि 1967 मधील या सार्वत्रिक निवडणुका आहेत. 1967 नंतर मात्र निवडणूक आयोगाला या निवडणुका एकत्रित घेता आल्या नाहीत. एक देश-एक निवडणूक ही संकल्पना अमलात यावी, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळेस एकत्रितपणे घेता याव्यात, यावर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी चर्चा घडवून आणली होती. न्या. बी. पी. जीवन यांच्या अध्यक्षतेखालील विधी आयोगाने 1999 मध्ये एक देश-एक निवडणुकीची शिफारस केली, तर खासदार सुदर्शन नचीअप्पन यांच्या नेतृत्वातील संसदीय समितीने 2015 मध्ये ही संकल्पना तत्त्वतः मान्य केली.

1952 च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत 16 लाख मतपेट्या वापरल्या गेल्या. कंपनीने पाच रुपये प्रतिपेटी याप्रमाणे त्या निवडणूक आयोगाला पुरविल्या. अल्पावधीत या मतपेट्या बनवून पुरविण्याचे आव्हान असल्याने दिवसाला पंधरा हजार मतपेट्या बनवून आपले उल्लेखनीय योगदान कंपनीने दिले. देशांतर्गत सार्वत्रिक निवडणुकीतील गुप्त मतदान पद्धती सर्वप्रथम दक्षिण ऑस्ट्रेलियाने 1856 मध्ये स्वीकारली. अमेरिकेने ही पद्धत 1884 नंतर स्वीकारली. ही गुप्त मतदान पद्धती ऑस्ट्रेलियन मतदान पद्धती म्हणून ओळखली जाते.

प्रत्येक उमेदवाराकरिता स्वतंत्र मतपेटी आणि मतपेटीवर त्या उमेदवाराच्या निवडणूक चिन्हाचा कागद लावला गेला.यात मतदानाविषयी मतदारांना माहिती देण्याकरिता डॉक्युमेंटरी फिल्म बनविल्या गेल्या. या डॉक्युमेंटरी फिल्म देशातील सिनेमागृहांत 1952 मध्ये दाखविल्या गेल्या. मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी या डॉक्युमेंटरी फिल्म बनविल्या गेल्या.

Exit mobile version