Panvel Accidents: तीन वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू

। पनवेल । प्रतिनिधी ।

पनवेल परिसरात गेल्या 24 तासात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. यामध्ये पनवेलकडून जेएनपीटीकडे जाणाऱ्या लेनवर मोटरसायकलला ट्रेलरने दिलेल्या धडकेत बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

पनवेलमधील इंडियाबुल्स येथील प्राशु भारद्वाज सिंग (18) आणि वंशिका भारद्वाज सिंग (20) हे दोघे बहीण-भाऊ मोटरसायकल क्र. एमएच 46 डीएच 2793 वरून जात होते. यावेळी पनवेलकडून जेएनपीटीकडे जाणाऱ्या लेनवर ट्रेलर क्रमांक जीजे 36 वी 2609 वरील चालक राजीव कुमार विजयशंकर याने ट्रेलर भरधाव वेगाने चालवून मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात मोटरसायकलवरील दोघेही खाली पडले. यात ते गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पनवेल शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

दुसऱ्या घटनेत पनवेल जवळील खंडोबा ढाबा समोरील रोडवर पेणच्या दिशेने मयत इसम पवनकुमार सरोज (वय -36, रा.वडाळा) या इसमाला प्रवासी बसवरील चालकाने त्याच्या ताब्यातील बस हयगयीने व बेदरकारपणे चालवून त्याला धडक दिली. या धडकेत पवनकुमार याचा मृत्यू झाला. अपघातानंतर बसचालक गाडीसह पसार झाला.

तर तिसऱ्या घटनेत कळंबोली येथील फुडलँड मॉलसमोरील सिग्नलजवळ एका भरधाव ट्रकने मोटारसायकलला धडक दिल्याने मोटारसायकलस्वार त्रिलोकसिंह गुमानसिंह डांगी (65) हे गंभीर जखमी होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version