। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील जुने मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेलकडे जाणार्या लेनवर कोन गावाच्या हद्दीत भीषण अपघाताची घटना घडली आहे. रस्त्याने चाललेल्या टँकरने अचानकपणे वळण घेतल्याने टँकरच्या चाकाखाली स्कुटी गाडी येऊन त्या गाडीवरील तिघेजण गंभीररित्या जखमी झाल्याने तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
शोबित सतीश सालुजा, त्याची पत्नी जुई सालुजा व मुलगी लाडो सालुजा असे तिघेजण त्यांच्याकडे असलेल्या अॅक्टीव्हा स्कुटी गाडी नं.एमएच-46-बीएल-4496 वरुन प्रवास करीत होते. दरम्यान, त्यांची गाडी गोल्डन नाईट बार समोरील कोन गाव हद्दीत आली असता समोरुन जाणार्या टँकर क्र. एमएच-04-केएफ-7417 वरील चालकाने त्याच्या ताब्यातील टँकरने अचानक वळण घेतल्याने शोबित सालुजा यांच्या ताब्यातील गाडी टँकरच्या चाकाखाली आली. यात तिघांचाही गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.