‘फ्लाईंग झोन’मधील फलक काढून टाकण्याची मागणी
| मुंबई | वृत्तसंस्था |
नवी मुंबई मधील नेरूळ जेट्टी रोडवरील एका या दिशादर्शक फलकावर गुरुवारी सहा फ्लेमिंगो आदळल़े त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला. तर, दोन गंभीर जखमी आहेत. फ्लेमिंगोंसाठी आवश्यक असलेले शेवाळ, मासे, किटक आदी खाद्या नवी मुंबई आणि उरण परिसरातील पाणथळी विपुल प्रमाणात असल्याने, तसेच वास्तव्यासाठी पोषक वातावरणही मिळत असल्याने हजारो किमी प्रवास करून फ्लेमिंगो येथे वास्तव्यासाठी येतात. परंतु त्यांच्या वाटेतील नेरूळ जेट्टी रस्त्यावरील दिशादर्शक फलक अडचणीचे ठरत आहे.
हे पक्षी फलकावर आदळल्यानंतर पर्यावरणवाद्यांनी हे दिशादर्शक फलक तातडीने हटवावा, अशी मागणी केली आहे. तसेच येथे होऊ घातलेला जलवाहतूक प्रकल्प अयशस्वी ठरल्याने जेट्टी वापरात आलेली नाही. त्यामुळे सिडको पाम बीच रोडवर एक कमान उभारून त्यावर दिशादर्शक चिन्ह लावावे, असे नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी.एन.कुमार यांनी सांगितले. नवी मुंबईला फ्लेमिंगो सिटीचा दर्जा देण्यात आला आहे. त्यानुसार स्थलांतरित पक्षी आणि त्यांच्या अधिवासांचे रक्षण करण्याच्या दृष्टीने जेट्टीवरील दिशादर्शक फलक काढण्यासाठी अधिकार्यांना पत्र पाठविणार असल्याचे नवी मुंबईतील रहिवासी रेखा सांखला यांनी सांगितले.
दरम्यान, ठाणे खाडी फ्लेमिंगो परिसरात भरतीची पातळी 15 सें.मीच्या पुढे गेल्यावर हजारो फ्लेमिंगो नवी मुंबईच्या पाणथळ जागेवर विश्रांतीसाठी येतात. त्यामुळे बेलपाडा, भेंडखळ, पाणजे, एनआरआय-टीएस चाणक्य आणि भांडुप उदंचन केंद्र येथील पाणथळ जागा संरक्षित कराव्या, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे.