| नागोठणे | वार्ताहर |
नागोठण्याजवळील सुकेळी येथील जिंदाल या पोलादी पाईपचे उत्पादन करणाऱ्या कंपनीत पाईप अंगावर पडल्याने कामगाराचा अपघाती मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी (दि.3) घडली आहे.
कौलेश बलदेव राय (46) रा. जिंदाल कॉलनी, सुकेळी असे मृत कामगाराचे नाव आहे. कौलेश हा हेल्परचे काम करीत होता. पाईप रॅकमध्ये एकावर एक रचून ठेवलेले पाईप क्रेनच्या सहाय्याने ट्रकमध्ये ठेवण्याकरिता कौलेश रॅकवर चढला असता त्यामधील एक पाईप घसरून त्याच्या अंगावर पडला. त्यामुळे तो दोन पाईपच्या मध्ये दबला गेला. कौलेश यास तात्काळ जिंदाल कंपनीच्या रुगणालयामध्ये नेले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. या घटनेची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास नागोठणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस.बी. चव्हाण करीत आहेत.