शेवटच्या दिवशी 371 उमेदवारांची धावपळ; कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल पालिकेच्या 15 जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी 20 प्रभागातील 78 जगांसाठी एकूण 400 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (दि.30) विविध पक्षांतील तसेच अपक्ष म्हणून 371 जणांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे.
पनवेल पालिकेसाठी 15 जानेवारी रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दि.23 ते 30 डिसेंबर पर्यंतचा अवधी देण्यात आला होता. पहिल्या दिवसांपासून अर्ज दाखल होणे अपेक्षित असताना पक्षातील बंडाली टाळण्यासाठी तसेच जागा वाटपाटील तिढा न सुटल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करणे टाळण्यात आले होते. यावेळी महाविकास आघाडी व महायुतीतील घटक पक्षांच्या अधिकृतच उमेदवारांसोबतच अपक्ष उमेदवारांनी मंगळवारी नियोजित वेळापत्रकानुसार आपले उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शनाने दाखल केले. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 30 डिसेंबर ही अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची मुदत असताना देखील 29 डिसेंबरपर्यंत 20 प्रभागातून केवळ 29 अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र, 30 डिसेंबर या शेवटच्या दिवशी तब्बल 371 अर्ज दाखल करण्यात आल्याने उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांची संख्या 400 इतकी झाली आहे.
यामध्ये मंगळवारी निवडणूक कार्यालय नावडे 1 प्रभाग 1,2 आणि 3 मध्ये एकूण 76 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले. निवडणूक कार्यालय 2 ‘अ’ खारघर प्रभाग 4,5,6 येथे एकूण 52 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले. निवडणूक कार्यालय 3 ‘ब’ कळंबोली प्रभाग 7, 8, 9, 10 येथे एकूण 77 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले आहेत.निवडणूक कार्यालय 4 ‘क’ कामोठे प्रभाग 11, 12, 13 येथे एकूण 60 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले. निवडणूक कार्यालय 5 ‘ड’ पनवेल 1 प्रभाग 14, 15, 16 येथे एकूण 52 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले. निवडणूक कार्यालय 6 ‘ड’ पनवेल 2 प्रभाग 17, 18, 19, 20 येथे एकूण 54 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले आहेत.
या नामनिर्देशन पत्रांची छाननी बुधवारी (दि.31)सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार आहे. वैधरीत्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी छाननीनंतर प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक शुक्रवार दि.2 जानेवारी असून, सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. तर, शनिवार दि. 3 जानेवारी रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार असून, त्याच दिवशी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जातणार आहे.
कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षातील उमेदवारांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रभाग कार्यालयाबाहेर प्रचंड गर्दी केली होती. यामध्ये महिला कार्यकर्त्यांची संख्या लक्षनीय होती. कार्यकर्त्यांना कोणतीही अडचण होऊ नये या करीता उमेदवारांकडून अत्यावश्यक सोयी करण्यात आली होती.
धावत पळत गाठले कार्यालय
अर्ज दाखल करण्यासाठी दुपारी 3 पर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली होती. याची माहिती असून देखील अनेक उमेदवारांनी मिरवणूकी द्वारे अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. मिरवणुकीत वेळ गेल्याने अनेक उमेदवारांना वेळ संपायला काही मिनिट उरलेली असताना धावत पळत कार्यालय गाठावे लागले.






