चार लाख अठरा हजारांचा गुटखा केला जप्त

| नवीन पनवेल | वार्ताहर |
आयजीपीएल नाका, तळोजा येथे एका टेम्पोमध्ये गुन्हे शाखा कक्ष 2 ने 4 लाख 18 हजारांचा गुटखा जप्त केला आहे. यादरम्यान सहा लाख रुपयांचा टेम्पो आणि बावन्न हजारांचे तीन मोबाईल जप्त केले आहेत. पिकअप टेम्पो क्रमांक एमएच 46 बीएफ 0098 या मधून रात्री उशिरा सूरत-गुजरातकडून खोणी फाटामार्गे तळोजा नाका येथून तळोजा एमआयडीसी परिसरात महाराष्ट्रत बंदी असलेल्या प्रतिबंधित पानमसाला व सुगंधी तंबाखूचा साठा घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष दोनला मिळाली. याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांना देण्यात आली. त्यानुसार आयपीएल नाका येथे पोलिसांनी सापळा रचला. यावेळी टेम्पो आला असता त्याला हात दाखवून थांबवण्यात आले. टेम्पोचे शटर उघडून आत पाहिले असता त्यात चार लाख 18 हजार रुपयांचा गुटखा सापडून आला. आरोपी सचिन साहेबराव गांगुर्डे (34, पालेखुर्द) व मिथुन चंद्रशहा शेट्टी (33, तळोजा) यांच्याविरोधात तळोज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version