आणखी दहा आरोपींना अटक; रायगड पोलिसांची कामगिरी
| खास प्रतिनिधी | रायगड |
जिल्ह्यामध्ये नुकतीच पोलीस भरती प्रक्रिया पार पडली होती. लेखी परीक्षेदरम्यान सहा उमेदवारांकडे इलेक्ट्रॉनिक ब्ल्यू टूथ डिवाईस मिळून आले होते. पोलिसांनी सहा जणांना अटक केली होती. यांना मदत करणार्या दहा जणांचा छडा रायगड पोलिसांनी लावला असून, याप्रकरणी त्यांनी राज्याच्या विविध भागातून तब्बल दहा आरोपींना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
10 ऑगस्ट 2024 रोजी रायगड जिल्ह्यात शिपाईच्या एकूण 391 पदांकरिता लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण सात परीक्षा केंद्रांवर एकूण पुरूष 1940 व महिला 1175 तसेच पेण पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील एकूण चार परीक्षा केंद्रांवर एकूण पुरूष 1632 उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली होती.
परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश करणार्या परीक्षार्थी उमेदवारांची तपासणी करत असताना अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील चार परीक्षा केंद्रांवर 5 व पेण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका परीक्षा केंद्रावर एक अशा एकूण सहा परीक्षार्थींच्या कानामध्ये इलेक्ट्रॉनिक ब्ल्यू टूथ डिवाईस मिळून आले होते. त्यामध्ये रामदास जनार्दन ढवळे (23) रा. नाळवंडी, जि. बीड, दत्ता सुभाष ढेंबरे (22) रा. मौजवाडी, जि. बीड, ईश्वर रतन जारवाल (21) रा. अंबड, जि. जालना, गोरख गंगाधर गडदे (24) रा. अंबेजोगाई, जि. बीड, सागर धरमसिंग जोनवाल (20) रा. गंगापूर, जि. संभाजीनगर, शेखर बाबासाहेब कोरडे (27) रा. नाळवंडी, जि. बीड यांचा समावेश होता.
राज्यात याआधी पोलीस भरती परीक्षेत असे प्रकार समोर आले होते. याचा खोलवर तपास करण्याचे आदेश कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, रसायनी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय बांगर, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि भास्कर जाधव, सपोनि संतोष आवटी, तसेच रायगड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक यांनी तपास केला. याकामी सायबर सेलचीदेखील त्यांना मदत मिळाली.
पवन त्रंबक बमनावत (25) रा. नळणी, जि. जालना, नारायण निवृत्ती राऊत (29) रा. नाळवंडी, जि. बीड, प्रताप उर्फ भावड्या शिवसिंग गोमलाडू (25) रा. वैजापूर, जि. छ. संभाजीनगर, कुमारी नागम्मा हनुमंत इबीटदार (20) रा. देगलूर, जि. नांदेड, अर्जुन नारायण बेडवाल (24) रा. परसोडा, जि. छ. संभाजीनगर, मंगेश बालाजी चोले उर्फ चोरमले सर (34) रा. जळकोट, लातूर, संतोष सांडू गुसिंगे (30) रा. पैठण, जि. छ. संभाजीनगर, कुमारी पूनम राम वाणी (23) रा. पडेगाव, जि. छ. संभाजीनगर, जीवन मानसिंग नायमने उर्फ एस. राठोड उर्फ करण जाधव, रा. जोडवाडी, जि. छ. संभाजीनगर, जालींदर श्रीराम काळे (32) रा. नाळवंडी, जि. बीड अशी अटक करण्यात आलेल्या दहा आरोपींची नावे आहेत. अद्याप अन्य आरोपींचा शोध सुरु आहे.