| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
जिल्हा वाहतूक शाखेतील पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांच्या बदलीनंतर सहा महिन्यांत चार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा वाहतूक शाखेला पूर्णवेळ अधिकारीच मिळाला नाही.
रायगड जिल्ह्यातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखा ही स्वतंत्र यंत्रणा आहे. पोलीस निरीक्षक यांच्या अधिपत्याखाली जिल्ह्यातील वाहतुकीची कारभार चालविला जातो. जिल्ह्यात साधारणतः 90 हून अधिक पोलीस कर्मचारी वाहतूक शाखेत आहेत. या शाखेमध्ये पोलीस निरीक्षक म्हणून अभिजीत भुजबळ हे गेल्या सहा महिन्यांपूर्वी होते. त्यांची बदली रसायनी पोलीस ठाण्यात केल्यावर जिल्हा वाहतूक शाखेचा भार सरिता चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला होता. काही महिने या विभागाचा कारभार त्यांच्या हाती होता. त्यानंतर त्यांची बदली अन्य जिल्ह्यात झाली. त्यामुळे मुंबईतून रायगड पोलीस दलात दाखल झालेले अभय शेलार यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली. एक महिना त्यांनी या विभागाचा कारभार सांभाळल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेले रोह्याचे पोलीस निरीक्षक मारूती पाटील यांच्या जागी अभय शेलार यांची बदली करण्यात आली. त्यामुळे जिल्हा वाहतूक शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक लाड यांच्याकडे ही जबाबदारी दिली. मात्र आता पुन्हा लाड यांच्या जागी पोलीस निरीक्षक म्हणून मारुती आंधळे यांची बदली झाली आहे. त्यामुळे जिल्हा वाहतूक शाखेतील चार अधिकाऱ्यांच्या सहा महिन्यात बदल्या करण्यात आल्याची माहितीसमोर आली आहे.
गेल्या चार दिवसांपूर्वी आंधळे यांनी कारभार हाती घेतला आहे. सहा महिन्यामध्ये जिल्हा वाहतूक शाखेमध्ये पूर्णवेळ अधिकारीच प्राप्त झाला नसल्याचा परिणाम जिल्ह्यातील वाहतुकीवर झाल्याचे बोलले जात आहे.







