। पालघर । प्रतिनिधी ।
पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर एमआयडीसीतील मेडली फार्मासिटिकल्स लिमिटेड या कंपनीत गुरुवारी (दि. 21) दुपारच्या सुमारास वायुगळती झाली. या वायुगळतीमुळे सहा कामगारांना बाधा झाली असून, यामध्ये चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर दोन कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. या वायूगळतीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
तारापूर औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नंबर 13 येथील मेडली फार्मा या कंपनीमध्ये नायट्रोजन रिएक्शन टॅंकमध्ये गॅसगळती झाल्याने हा अपघात घडला. त्यात सहा व्यक्ती बाधित झाले असता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान चार जणांचा मृत्यू झाला. कल्पेश राऊत, बंगाली ठाकूर, धीरज प्रजापती, कमलेश यादव अशी मृतांची नावे असून रोहन शिंदे आणि निलेश हाडळ या दोघांची परिस्थिती गंभीर असून त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) भरती करण्यात आले आहे.
दरम्यान, ही वायू गळती नेमकी कशामुळे झाली याचा तपास पुढे सुरू करण्यात आला असून याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल, असे पालघर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
तारापूरमधील फार्मा कंपनीत वायुगळती; चार जणांचा मृत्यू
