मात्र खारकिवमधील पाच जण अजूनही भीतीच्या छायेतच
। अलिबाग । भारत रांजणकर ।
रायगड जिल्ह्यातील 32 विद्यार्थी शिक्षणासाठी युक्रेनमध्ये होते. यापैकी चार विद्यार्थी आत्तापर्यंत परतले आहेत. तर 28 विद्यार्थी अजूनही युक्रेन मधील विवीध शहरात अडकून पडले आहेत. त्यापैकी या सर्वांना तातडीने भारतात आणावे अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून केली जात आहे. रशियाने युक्रेनच्या दुसर्या क्रमांकाचे शहर असलेल्या खारकीव्हमध्ये मिसाईल हल्ला केला या हल्लयात कर्नाटक येथील नवीन शेखरप्पा ज्ञानगोदर या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील पाच विद्यार्थी खारकीव्हमध्ये अडकून पडले असल्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण कायम आहे.
रायगडला परत आलेल्यांमध्ये विन्नित्सा येथून आर्यन राजेंद्र पाटील, झिराड आळी, पेण, पुर्वा पराग पाटील, धेरंड ता. अलिबाग, तर ओडेसा येथून साल्वा मोहम्मद सलीम धनसे, खोपोली, इवानो येथून प्राची दिपक पवार करंजाडे, पनवेल यांचा समावेश आहे.
डॉक्टरकीचे शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले रायगडातील 32 विद्यार्थी हे युक्रेनच्या विविध भागात अडकले होते. त्यापैकी चार विद्यार्थी परतले असले तरी 28 अजूनही सुटकेच्या प्रतिक्षेतच आहेतत्र रायगडातील अलिबाग, महाड, पेण, तळा, माणगाव, खोपोली, पनवेल, तळा या तालुक्यातील विद्यार्थी अडकले आहेत. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. देशातील 12 हजार पेक्षा जास्त लोक युक्रेन मध्ये असून त्यातील 1200 च्यावर विद्यार्थी शिकण्यासाठी गेलेले आहेत. आतापर्यंत देशभरातील 1 हजार 629 जण मायदेशात परतले असल्याचे वृत्त आहे. यापैकी जे विद्यार्थी रशिया आणि युक्रेनच्या सिमेजवळच्या प्रांतातील शहरात आहेत. त्यांच्यावर कठीण प्रसंग आला असल्याचे पालकांनी सांगितले. भारतीय दुतावास हव्या त्या गतीने हालचाली करत नसल्याचे म्हणणे या विद्यार्थ्यांच्या पालकांचे आहे. या परिसरातील एखाद दुसरे दुकान सुरु असल्याने खाण्यापिण्याचे साहित्य दुर्मिळ झाले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मदतीची गरज असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
अनेक विद्यार्थ्यांनी तेथील प्रशासन आणि भारतीय दुतावासाच्या अधिकार्यांच्या सुचनेनुसार स्वतःचा जिव मुठीत घेऊन बसमार्ग दहा बारा तासांचा प्रवास करुन कसेबसे रोमानियाच्या सिमेजवळ पोहचू शकले आहेत. तिथून आता विमानाने त्यांना परत पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.