। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना अलिबाग शहर पुरस्कृत व प्रशांत नाईक मित्रमंडळ अलिबाग आयोजित तीन दिवसीय नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी गुरुवारी (दि.09) झालेल्या सामन्यात चार संघांनी सुपर आठमध्ये प्रवेश केला आहे. प्रत्यक्ष मैदानाबरोबरच ऑनलाईनदेखील क्रीडाप्रेमींनी या स्पर्धेचा आनंद लुटला. या सर्व सामन्यांचे समालोचन संदीप जगे यांनी केले.
अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या संकल्पनेतून गतवर्षापासून अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीदेखील ही स्पर्धा अलिबाग येथील क्रीडा भूवनमध्ये भरविण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी या स्पर्धेचा शुभारंभ शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. पहिल्या दिवशी गुरुवारी (दि.09) सायंकाळी सुरु झालेली स्पर्धा शुक्रवारी(दि.10) सकाळपर्यंत झाली. या स्पर्धेत वेगवेगळ्या संघातील खेळाडूंनी जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. गोलदांज, क्षेत्ररक्षक, फलंदाज, यष्टीरक्षक अशा सर्वांनीच आपल्या परिने मेहनत घेत यश आपल्या हाती घेण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या संघातील गोलंदाजासह फलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षकांची कामगिरी महत्वपूर्ण ठरली.
प्रेक्षणीय सामना अलिबाग प्रेस असोसिएशन विरूध्द अॅड. इलेव्हन अलिबाग या संघात झाला. अॅड. इलेव्हन संघाने सुरुवातीला फलंदाजी स्वीकारली. चार षटकात 70 धावा केल्या होत्या. अलिबाग प्रेस असोसिएशन समोर चार षटकांत 71 धावांचे आव्हान होते. मात्र चार षटकात फक्त 16 धावा देत चार खेळाडू बाद करीत अॅड. इलेव्हन संघाने हा सामना जिंकला. अॅड. इलेव्हन अलिबाग संघ प्रेक्षणीय सामन्याचा विजेता ठरला असून अॅड. महेश म्हात्रे सामनावीर ठरले. तसेच अलिबाग प्रेस असोसिएशन संघ उपविजेता ठरला. या दोन्ही संघाला मान्यवरांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले.
त्यानंतर प्रत्यक्ष निमंत्रित संघामध्ये सामना भरविण्यात आला. सुरुवातीचा सामना अर्जून इलेव्हन दिघोडी आणि जे.डी. भार्गवी इलेव्हन अलिबाग या संघात झाला. त्यामध्ये दिघोडी संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले. भार्गवी इलेव्हन संघाने फलंदाजी करीत 5 षटकात सहा बाद 22 धावा काढल्या. त्यामुळे दिघोडी संघासमोर पाच षटकात 23 धावांचे लक्ष होते. 2.1 षटकात एक बाद 26 धावा करीत त्यांनी विजय मिळविला.
प्रफुल्ल अॅन्ड निलेश स्पोर्टस साखर आणि फैजी इलेव्हन अलिबाग या संघामध्ये दुसरा सामना झाला. फैजी इलेव्हन संघाने क्षेत्ररक्षण केले. पाच षटकात प्रफुल्ल अॅन्ड निलेश स्पोर्टस साखर संघाने 36 धावा केल्या. फैजी संघासमोर विजयासाठी 37 धावांचे आव्हान होते. परंतु पाच षटकात फक्त 26 धावांवर हा खेळ संपविण्यास साखर संघाला यश आले. या सामन्यातील दुसरा विजेता साखर संघ ठरला.
तिसरा सामना अर्जून इलेव्हन दिघोडी आणि प्रफुल्ल अॅन्ड निलेश स्पोर्टस् साखर या संघामध्ये झाला. दिघोडी संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले. साखर संघाने पाच षटकात 45 धावा केल्या. त्यांनतर दिघोडी संघाने फलंदाजीला सुरुवात केली. 46 धावांची गरज या संघाला होती. परंतू पाच षटकात 39 धावांमध्येच हा सामना संपला. त्यामुळे तिसर्या सामन्यातील साखर संघ विजेता ठरला.
चौथा सामना जे.डी. भार्गवी इलेव्हन अलिबाग आणि फैजी इलेव्हन अलिबाग या संघामध्ये झाला. भार्गवी संघाने पाच षटकात 47 धावा केल्या होत्या. विजयासासाठी फैजी संघासमोर 48 धावांचे लक्ष होते. परंतू पाच षटकामध्ये फैजी संघाला 38 धावांवर समाधान मानावे लागले. या स्पर्धेतील भार्गवी संघ विजेता ठरला. पहिल्या दिवशी झालेली नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धा आठ संघामध्ये झाली.
दरम्यान, आठ संघाच्या सामन्यात चार संघ विजयी झाले असून ते सुपर एटमध्ये गेले आहेत. प्रफुल्ल अॅन्ड निलेश स्पोर्टस् साखर, जे.डी. भार्गवी इलेव्हन अलिबाग, ए.बी. ग्रुप अलिबाग आणि यु. व्ही. स्पोर्टस् अलिबाग या संघाचा त्यामध्ये समावेश आहे.
विजेत्यांना आकर्षक बक्षिसे
शनिवारी सायंकाळपासून सुपर एटच्या संघामध्ये लढत होणार आहे. त्यात विजयी चार संघात सामना रंगणार आहे. अंतिम विजेता संघ अलिबाग चॅम्पियन्स चषकाचा मानकरी ठरणार आहे. अंतिम विजेत्या संघाला दोन लाख रुपये व चषक, द्वितीय क्रमांकाला एक लाख रुपये व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकाला प्रत्येकी 50 हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. मालिकावीराला दुचाकी, उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाज यांना सायकल आणि विजेता व उपविजेता संघ मालकाला एलईडी टीव्ही देऊन सन्मानित केले जाणार आहे.
कोण ठरणार अलिबाग ‘चॅम्पियन्स’?
अलिबागच्या समुद्रकिनारी असलेल्या क्रीडा भुवन येथे नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर कोण ठरणार अलिबागच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा मानकरी याकडे प्रेक्षकांसह संपूर्ण अलिबागकरांचे लक्ष लागून राहिले आहे. गुरुवारपासून क्रीडा भूवन येथे क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी आठ संघामध्ये स्पर्धा झाली. त्यात चार संघाची सुपर आठ मध्ये निवड झाली. दुसर्या दिवशीदेखील शुक्रवारी सायंकाळपासून सामने सुरु झाले. यामधील चार संघाची सुपर आठमध्ये निवड होणार आहे. शनिवारी सायंकाळी सुपर आठ संघातील क्रिकेटचा थरार पहावयास मिळणार आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर संघातील अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा मानकरी कोण ठरणार आहे, याकडे लक्ष लागून राहिले आहे.