वाहनाच्या धडकेत कोल्हा जखमी

| उरण । वार्ताहर ।

खोपटा परिसराला जोडणार्‍या मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत कोल्हा जखमी झाला आहे. सोमवारी उरण खोपटा मार्गावर एक कोल्हा जखमी अवस्थेत आढळला आहे. या जखमी कोल्ह्यावर उपचार करता यावेत याकरीता उरणमधील निसर्ग व सर्प मित्र प्रयत्न करीत आहेत.

काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे उरण तालुक्यातील डोंगरी पाणजे येथील पाणथळ भागात दोन कोल्हे निदर्शनास आले होते. उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास व नवी मुंबईचा परिसर म्हणून नागरीकरण वाढू लागला आहे. त्यासाठी येथील जंगल व रान मातीच्या भरावसाठी पोखरले जात आहेत. त्यामुळे उरणमधील वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या घटनांमुळे उरणच्या औद्योगिक परिसरात ही कोल्ह्याचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर हा कोल्हा उरणच्या पूर्व भागात जखमी अवस्थेत आढळून आला असल्याची माहिती निसर्ग व वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष विवेक केणी यांनी दिली आहे.

Exit mobile version