सुरस आणि लांच्छनास्पद

जगातील आघाडीचा शेअर बाजार म्हणून गणला जाणारा भारतीय शेअर बाजार हा कसा आणि कोणत्या पद्धतीने चालतो याचे अलिकडे उघड झालेले रहस्य कोणालाही सुरस आणि चमत्कारीक प्रकारात बसणारे वाटू शकेल. परंतु कोणीही शहाण्या, जागरुक भारतीय नागरिकाला ही बाब अत्यंत लांच्छनास्पदच वाटेल. या संदर्भात सीबीआयने आनंद सुब्रमण्यम यास अटक केली असून त्यातून या विलक्षण कथेतील सर्वांत रहस्यमय पात्राचा उलगडा होईल अशी अपेक्षा आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चित्रा रामकृष्णन यांच्यावर त्यांनी हिमालयात राहणार्‍या एका अज्ञात अध्यात्मिक गुरुच्या आदेशानुसार शेअर बाजार चालवल्याचा आरोप आहे. स्टॉक एक्सचेंजवर नियामक म्हणून काम करणार्‍या सेबीने केलेल्या या धक्कादायक खुलाशानंतर त्यांच्या मुंबईतील राहत्या घरासह इतर विविध ठिकाणांवर इन्कम टॅक्स विभागाने छापेमारी सुरु केली होती. या अज्ञात आणि सिद्ध गुरूचे दर्शन केवळ त्यांना एकटीलाच होत होते आणि त्या गुरुला मात्र त्या व्यवस्थित दिसत होत्या असे तपशील बाहेर आले आहेत. सर्वसाधारणपणे भारतीय माणसाच्या आध्यात्मिक आणि वैचारिक पातळी पाहता त्याला अशा गुरूंची केवळ माहितीच नसते तर तो त्यापैकी काहींचा भक्तही असू शकतो. प्रत्येक नागरिकाला आपला धर्म आपल्या व्यक्तिगत पातळीवर पाळायची पूर्ण मुभा असल्याने केवळ डोळ्यांनाच दिसणार्‍या गुरुंवर श्रद्धा असावी, असा आग्रह धरता येत नाही. तथापि, भारतातील कोट्यवधी लोक जेथे आपल्या कष्टाच्या पैशांची उज्वल भविष्यासाठी, आर्थिक लाभासाठी गुंतवणूक करतात अशा ठिकाणच्या कायदा नियमांची काटेकोर काळजी घेतली जाते की नाही हे तपासण्याची जबाबदारी असलेल्या विभागाचे प्रमुख म्हणून काम करताना आध्यात्मिक आधाराने काम करता येत नाही. म्हणूनच या प्रकरणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शेअरबाजारात भोंदूगिरी करणार्‍यांवर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची तसेच चित्रा रामकृष्ण आणि या भोंदूबाबाची कठोर चौकशी करण्याची मागणी केली आहे. कारण, जादूटोणा विरोधी कायद्यानुसार, दैवी शक्तीचा दावा करणे आणि त्या आधारे लोकांना फसवणे हा गुन्हा आहे. को-लोकेशन घोटाळा प्रकरणी चित्रा रामकृष्ण यांनी सेबीला दिलेल्या जबाबात त्यांनी आनंद सुब्रमण्यम यांची नेमणूक आणि इतर बाबींत त्यांच्या हिमालयातील अध्यात्मिक गुरूचा सल्ला घेत असल्याचे नमूद केले आहे. आणि सदर गुरूचा ठावठिकाणा सांगता येत नाही, कारण त्यांना मानवी देह नाही, असे त्यांनी सांगितले होते. या जादूटोणा विरोधी कायद्यानुसार अतींद्रिय शक्तींचा दावा करून फसवणे हा गुन्हा आहे. कारण, प्रत्यक्षात शरीराशिवाय कोणतेही अस्तित्व शक्य नाही. या ज्येष्ठ पदावरील बाईंनी नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे को-लोकेशन काही निवडक दलालांना उपलब्ध करून देऊन घोटाळा केला. त्यात ओपीजी सिक्युरिटीज नावाच्या ब्रोकरेज कंपनीला फायदा मिळवून दिल्याचे स्पष्ट झाले. या को-लोकेशन सुविधेमुळे काही दलालांना ती सुविधा नसलेल्यांच्या तुलनेत आधी सर्व माहिती मिळत होती. अशा प्रकारे काही क्षणांसाठीची ही सुविधा कोट्यवधी रुपयांची उलाढाल गैरप्रकारे करण्यास कारणीभूत ठरली. या चित्रा सर्वोच्च पदावर पोहोचल्यावर हा गैरप्रकार सुरू झाला. त्यानंतर त्यांनी आनंद हा त्यांचा जवळचा सहकारी बनला आणि घोटाळा सुरूच राहिला. त्याला त्यांनी भराभर पदोन्नती दिली होती. 2015 सालपासून होत असलेला हा घोटाळा असाच चालू राहिला असता, परंतु सिंगापूरच्या एका सद्सद्विवेकबुद्धीच्या व्यक्तीने हे उघड केले आणि हा प्रकार कळला. तर सीबीआय आनंद सुब्रमण्यम यांचीही चौकशी करत होती. हा अज्ञात योगी शरीर नसूनही चित्रा यांना इमेल पाठवत होता. त्या संभाषणाचीही चौकशी झाली. अखेर या आनंदला अटक झाली. तर सांगायचे असे की हिमालयातील योगी हा दुसरा तिसरा कोणी नसून आनंद हाच असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तसे सेबीला सादर केलेल्या निवेदनात एनएसईने म्हटले होते. आनंद हा खरा योगीचे बनावट रूप धारण केलेला व्यक्ती असून चित्रा त्याच्याकडूनच माहिती घेत होती. मात्र, सेबीने हा मुद्दा मान्य केला नव्हता. आता ते उघड होईल, असे दिसते. परंतु तेवढ्याने प्रश्‍न मिटत नाही. जगात आर्थिक महासत्ता म्हणून उभे राहू पाहणार्‍या आपल्या देशातील या घडामोडी जग पाहात आहे. ती आपल्यासाठी लाजीरवाणी बाब आहे. आपण अजूनही पुरेशा सशक्त व्यवस्था आणि माणसे निर्माण करू शकलो नाही, हेच यातून दिसून येते.

Exit mobile version