बनावट ओळखपत्र तयार करून फसवणूक

दोन बांगलादेशींना घेतले ताब्यात

। पनवेल । प्रतिनिधी ।

बांगलादेशी नागरिकांनी ओळख लपवण्याच्या उद्देशाने त्यांचे मुस्लिम नाव बदलून हिंदू नावाचे बनावट भारतीय आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, निवडणूक ओळखपत्र तयार करून फसवणूक करण्याच्या उद्देशाने संगणमत करून तो दस्तऐवज खरा म्हणून वापर केला. या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दोन बांगलादेशी नागरिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

नवी मुंबई दहशतवाद विरोधी पथकाला पोपेटा बिल्डिंग, कोळवाडी, पडघे येथे काही बांगलादेशी नागरिक बेकायदेशीर वास्तव करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार 15 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी रंजन सत्यरंजनदास उर्फ अस्लम अब्दुल कुडूस शेख (35) आणि हुस्सना अस्लम शेख उर्फ मलीना रंजनदास यांना ताब्यात घेण्यात आले. ते मागील चार वर्षापासून रहावयास आहेत. 2015 मध्ये बांगलादेश मधील गरिबीला कंटाळून घुसखोरीच्या मार्गाने त्यांनी भारतात प्रवेश केल्याचे सांगितले. त्यांनी बांगलादेशी ओळख लपवण्यासाठी व भारतात काम मिळवण्यासाठी त्याने रंजन सप्तरंजनदास असे हिंदू नावाने बनावट आधार कार्ड, भारतीय पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र बनवले असल्याचे सांगितले. 2016 मध्ये त्याची ओळख हुस्ना अस्लम शेख उर्फ मलीना रंजनदास या महिलेसोबत झाली. ती देखील भारतात अवैधरित्या प्रवेश करून राहत असल्याची माहिती त्याला मिळाली. त्याने तिच्यासोबत 2016 मध्ये लग्न केले. त्यावेळी तिने बांगलादेशी व मुस्लिम ओळख लपवण्यासाठी मलीना रंजनदास या नावाने वाल्मिकी नगर, परदेशी आळी, श्री लॉज जवळ, पनवेल या पत्त्यावर आधार कार्ड तयार केले व खांदा कॉलनी येथे घरकाम करत असे.

अस्लम शेख उर्फ रंजन हा त्याच्या आई-वडील व नातेवाईकांना बांगलादेशमध्ये संपर्क करण्यासाठी इमो या एप्लीकेशनचा व व्हाट्सअप कॉलिंगचा वापर करत असे. यावेळी त्याच्याकडे मोबाईल, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँकेचे पासबुक, घर भाडेकरार पत्र तर मलीना दासकडे आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र सापडून आले.

Exit mobile version