नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

आरोपीला 1 वर्षाचा सश्रम कारावास
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जॉन्सन कंपनी व सुप्रीम कंपनीमध्ये पैसे देवून नोकरीस लावून देतो असे सांगत पैसे उकळून नोकरी न लावता पैसेही परत करण्यास नकार देणार्‍या भालचंद्र विश्‍वनाथ पळणीटकर याला अलिबाग न्याय दंडाधिकार्‍यांनी 1 वर्ष सश्रम कारावास आणि 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
आरोपी भालचंद्र विश्‍वनाथ पळणीटकर रा.ब्राम्हणआळी, ता.अलिबाग, जि. रायगड यांनी फिर्यादी रुपेश रोहीदास नाईक व इतर साक्षीदार यांना जॉन्सन कंपनी व सुप्रीम कंपनीमध्ये पैसे देवून नोकरीस लावून देतो असे आश्‍वासन दिले होते. त्यासाठी त्याने अनेकांजवळून पैसे उकळले होते. मात्र कोणालाच त्याने नोकरी लावली नाहीच व घेतलेले पैसेही परत दिले नाहीत. अशा प्रकारे फिर्यादी व इतर साक्षीदार यांची त्याने फसवणूक केल्याचे लक्षात येताच त्याच्याविरोधात अलिबाग पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी होऊन आरोपी भालचंद्र पळणीटकर याला भा.द.वि.कलम 420 प्रमाणे दोषी ठरवून अलिबाग मुख्य न्यायदंडाधिकारी एस.एस.पिंगळे यांनी 1 वर्षाचा सश्रम कारावास व रक्कम रुपये 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यामध्ये अभियोग पक्षातर्फे सरकारी वकील कविता परीट व संजय राठोड यांनी काम पाहीले. तसेच पैरवी अधिकारी पोलीस नाईक जी.के. हाके व पी.एन. ठाकूर यांचे सहकार्य मिळाले. या खटल्यात अभियोगपक्षातर्फे एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. सदर खटल्यात सर्वच साक्षीदारांची साक्ष महत्वपूर्ण ठरली.

Exit mobile version